अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील सावेडी भागातील गंगा उद्यान परिसरात रविवारी (29 नोव्हेंबर) सकाळपासून दोन वेळा बिबट्या दिसल्याने त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. थर्मल ड्रोन आणि अन्य आधुनिक साधनांच्या मदतीने बिबट्याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप बिबट्या हाती लागलेला नाही.
रविवारी सकाळपासून दोन वेळा बिबट्या दिसल्याने वन विभागाने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. थर्मल ड्रोनच्या माध्यमातून परिसराची पाहणी करण्यात येत असून, वन विभागाचे कर्मचारीही परिसरात तैनात आहेत. दरम्यान, बिबट्या दिसल्याची माहिती परिसरात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
बिबट्याच्या हालचाली पाहण्याच्या उत्सुकतेपोटी नागरिक घटनास्थळी जमा होत असल्याने शोधमोहिमेत अडथळे निर्माण होत होते. पोलिसांकडून नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. वन विभागाकडून बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिबट्याच्या वावरामुळे सावेडी परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, त्याला लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.




