Monday, November 30, 2026
HomeनगरAccident News : कोंची शिवारातील अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : कोंची शिवारातील अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

मृत राहाता तालुक्यातील

आश्वी |वार्ताहर| Ashwi

कोल्हार-संगमनेर राज्य महामार्गावरील कोंची (ता. संगमनेर) शिवारात रविवारी (दि. 29) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून प्रवास करणार्‍या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. मयत दाम्पत्य हे राहाता तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. रामभाऊ जगन्नाथ राशिनकर (वय 60) आणि विमल रामभाऊ राशिनकर (वय 54, दोघे रा. धनगरवाडी, ता. राहाता) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पती-पत्नीची नावे आहेत.

- Advertisement -

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राशिनकर दाम्पत्य रविवारी आपल्या दुचाकीवरून कोल्हार-संगमनेर राज्य महामार्गावरून प्रवास करत होते. दुपारी पावणेबारा ते सव्वा बारा वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी कोंची शिवारात आली असता, ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थ आणि महामार्गावरून जाणार्‍या प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी संगमनेरातील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, याचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासानंतरचं अपघाताबाबत अधिकृत सविस्तर माहिती समोर येईल.

ताज्या बातम्या

Crime News : दांपत्य हॉस्पिटलमध्ये जाताच कारमधील दागिने, रोकड लंपास!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील फाटके पाटील हॉस्पिटलसमोर कार उभी करून पती-पत्नी उपचारासाठी गेले असताना चोरट्याने कारचा दरवाजा व काच उघडून पर्स चोरून नेली. या पर्समध्ये...