मुंबई | Mumbai
मागील काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तसेच मंत्रिमंडळ विस्तारात अनेक महत्त्वाची खाती भाजपने आपल्याकडे ठेवली. त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडले, तर भाजप ठाकरे गटासोबत एकत्र येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत भेट घेतली आहे.
मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आमदार आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. यापूर्वी दोन वेळा आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, यात जास्त काही गुपित नाही, मतदारसंघातील विविध प्रश्न आणि वरळीत राहणाऱ्या पोलीस पत्नी आणि गृहनिर्माणबाबत फडणवीसांसोबत चर्चा झाली, असल्याचे ठाकरेंनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, पोलीस निवासात राहणाऱ्या निवृत्त पोलिसांना दंड लावला आहे, तो पर स्केवर फूट २० रुपयांचा दर १५० रुपये केला आहे. तो कमी करावा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. पोलिसांच्या अनेक पिढ्यांनी मुंबईची सेवा केली असून निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं कशी देता येतील याबाबत चर्चा केली. शिवाय मुंबई पोलिसांची निवासस्थाने आहेत त्यांच्या डागडुजीचा प्रश्न फडणवीसांसमोर मांडला असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
तसेच मुंबईत सर्वांसाठी पाणी ही योजना आम्ही आणली होती. मात्र, मागच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. कोणत्याही सोसायटीचे लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी मिळणे हे हक्काचे आहे, सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लागू करावी, त्यावरील स्थगिती हटवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच टोरेस घोटाळ्याप्रकरणी कारवाईची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी म्हटले. आताच्या घडीला फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विरोधक म्हणून आम्ही काही प्रश्न त्यांच्याकडे मांडत असू, तर त्यात काहीच चुकीचे नाही. जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी म्हणून काम करायला हवे, असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हणाले.