Wednesday, May 20, 2026
HomeराजकीयAaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा? १९ जूनला मोठी घोषणा...

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा? १९ जूनला मोठी घोषणा होण्याची शक्यता

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटाकडून लवकरच एक मोठा संघटनात्मक बदल केला जाण्याची शक्यता आहे. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची (Working President) महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे पक्षात आदित्य ठाकरे यांचे वजन वाढणार असून, त्यांच्याकडे धोरणात्मक निर्णयांचे सर्वाधिकार येण्याची शक्यता आहे.

पक्षांतर्गत वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, २००३ साली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती, अगदी त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांची निवड केली जाणार आहे. यासाठी लवकरच शिवसेना पक्षाची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक बोलावण्यात येईल. या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा रितसर प्रस्ताव मांडला जाईल आणि तो मंजूर करून त्यांच्याकडे नेतृत्वाची सूत्रे दिली जातील, असे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून आदित्य ठाकरे हे केवळ युवासेनेपुरते मर्यादित न राहता, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत आणि निवडणुकीच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासोबतच राज्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आणि तरुणांची नवी फळी बांधण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्य जबाबदारी असावी, असा एक मोठा मतप्रवाह पक्षात निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या चर्चेतही या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनीही या संभाव्य निर्णयाचे स्वागत केले आहे. “तरुण पिढीच्या हाती नेतृत्व जाणे ही काळाची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनीही कालांतराने कार्याध्यक्षपद भूषवले होते, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी गेल्यास त्याचे स्वागतच झाले पाहिजे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमने केलेले काम कौतुकास्पद आहे,” असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

एकूणच, आगामी निवडणुकांचे आव्हान पाहता आदित्य ठाकरे यांना राजकारणात एक पाऊल पुढे नेण्यासाठी ठाकरे गटाने ही रणनीती आखल्याचे दिसत आहे. १९ जूनच्या वर्धापन दिनाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर ही नवी जबाबदारी पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...