नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून काही काँग्रेस उमेदवारांना अर्थसहाय्य करत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला. भाजपने काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित, फरहाद सूरी यांना कोट्यवधींचा निधी दिल्याचा दावाही आतिशींनी केलाय. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काँग्रेसने अजय माकन यांच्यावर २४ तासांत कारवाई करावी असा इशारा दिला आहे. जर काँग्रेसने दिल्ली काँग्रेसचे नेते अजय माकन यांच्यावर कारवाई नाही केली तर, ते काँग्रेसला इंडिया आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी, काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी भाजापाला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपाकडून काँग्रेसला आर्थिक रसद पुरवली जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित आणि अजय माकन यांच्याविरोधात कारवाई केली गेली पाहिजे. काँग्रेसने तसे न केल्यास त्यांना इंडिया ब्लॉकमधून काढून टाकण्यासाठी आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा केली जाईल असे सांगितले.
यावेळी खासदार संजय सिंह म्हणाले, “दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा व्हावा यासाठी काँग्रेस त्यांना मदत करत आहे. अजय माकन भाजपाची स्क्रिप्ट वाचत असतात, ते भाजपाच्या इशाऱ्यावर विधाने करतात आणि भाजपाच्या सूचनेनुसार आप नेत्यांना लक्ष्य करतात. काल त्यांनी सर्व मर्यादा ओलांडत आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले.” दिल्लीतील जनतेसाठी हॉस्पिटल, शिक्षण, पाण्याची सोय करणारे केजरीवाल देशद्रोही कसे? अजय माकन यांनी कोणत्याही भाजपच्या नेत्याला या आधी देशद्रोही म्हटले नव्हते. काँग्रेस पक्षाने २४ तासांत त्यांच्यावर कारवाई करावी. जर काँग्रेसने तसे केले नाही, तर आप इंडिया आघाडीच्या नेत्यांकडे काँग्रेसला या आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करेल.
आतिशी म्हणाल्या की, “आज काँग्रेस अरविंद केजरीवाल यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करत आहे. काँग्रेसने काल माझ्या आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने भाजपाच्या कोणत्याही नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे का? काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपाकडून होत असल्याचे आम्हाला सूत्रांकडून समजले आहे. भाजपाचा काँग्रेसच्या उमेदवारांना निधी देत आहे.”
काँग्रेसने हे साटेलोटे भाजपाला जिंकवण्यासाठी केले होते. जर असे साटेलोटे नसेल तर अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी यांची निवडणूक कोण लढवत आहे, असा सवालही आतिशी यांनी यावेळी विचारला.