Friday, July 24, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘लक्षवेध’ मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले

Ahilyanagar : ‘लक्षवेध’ मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले

सुमारे 2.98 कोटींची फसवणूक || चेअरमन फुंदेसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील चास व परिसरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या लक्षवेध मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेमार्फत मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, सुमारे 2 कोटी 98 लाख 56 हजार 638 रूपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी (29 एप्रिल) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

चास येथील शेतकरी गोरख गिताराम काळे (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेअरमन नीलेश शिवाजी फुंदे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) याच्यासह महेश भास्कर भोर (रा. भोरवाडी, ता. अहिल्यानगर), आकाश दत्तात्रय ढगे (रा. कामठी, ता. श्रीगोंदा), प्रदीप चंद्रकांत जगताप (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा), पुनम किशोरलाल मुथ्था (रा. केडगाव, अहिल्यानगर), सुभाष तुकाराम आरडे (रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) व विद्या वैजनाथ ढाकणे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

गोरख काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते कुटुंबासह चास येथे वास्तव्यास असून, खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी वडिलोपार्जित जमीन विक्री केल्याने पैसे आले होती. त्याच दरम्यान लक्षवेध संस्थेचा चेअरमन नीलेश फुंदे याने त्यांना 12 टक्के व्याजाचे आमिष दाखवले. त्यासाठी तो त्यांच्या घरी देखील गेला होता. सुरूवातीला नकार दिल्यानंतरही वारंवार आग्रह करून काळे यांना चास येथील शाखेला भेट देण्याची विनंती केली. काळे हे शाखेत गेले असता फुंदे याने त्यांना आकर्षक जाहिराती व जास्त व्याजाचे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून काळे यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी 10 लाख रूपये मुदतठेव म्हणून जमा केले. शाखा व्यवस्थापक प्रशांत बाबासाहेब गुंजाळ यांनी त्यांना पावती दिली.

मात्र, काही दिवसांपूर्वी संस्थेबाबत अफवा पसरू लागल्याने काळे यांनी पैसे परत मागितले असता, संस्थेकडे निधी नसल्याचे सांगण्यात आले. तसेच चेअरमन व संचालक मंडळाने मोबाईल बंद करून संपर्क तोडल्याचे समजले. वारंवार शाखेला भेट दिल्यानंतर ती बंद असल्याचे आढळून आले. यानंतर काळे यांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली. चौकशीअंती पोलिसांनी चेअरमन फुंदे याच्यासह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

12 टक्के व्याजाचे आमिष
गोरख काळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी लक्षवेध मल्टीस्टेटबाबत अधिक चौकशी केली असता, सन 2023 पासूनच संस्थेच्या नावाखाली मुदत ठेवीवर 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करून फसवणूक केल्याचे उघड झाले. काळे यांच्या माहितीनुसार, चास, भोयरे पठार, बाबुर्डी बेंद, अकोळनेर, निंबळक आदी गावांतील सुमारे 105 ठेवीदारांचे सुमारे 2 कोटी 98 लाख 56 हजार 638 रूपये अडकले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चेअरमन फुंदे अटकेत
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संशयित आरोपींनी लक्षवेध संस्थेच्या विविध शाखांव्दारे ठेवी स्वीकारून उच्च व्याजाचे आमिष दाखवले आणि नंतर पैसे परत न करता पलायन केले. त्यामुळे सर्व ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण असून, संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी चेअरमन फुंदे याला बोधेगाव येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता होती. पोलिसांनी 24 तासात फुंदे याला अटक केली असल्याचे ठेवीदारांतून समाधान व्यक्त होत आहे.

फुंदेचे अनेक कारनामे
चेअरमन फुंदे याने लक्षवेध मल्टीस्टेट मध्येच नाही तर इतर संस्थांमध्ये देखील लोकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ध्येय मल्टीस्टेट फसवणूक प्रकरणात देखील फुंदे संशयित आरोपी आहे. तो ध्येय मल्टीस्टेटचा संचालक आहे. तसेच सह्याद्री मल्टीस्टेटमध्ये देखील त्याचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....