अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थ्यांसह पालकांची पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी धावपळ सुरू असतांना आपले सरकार पोर्टल बंद पडल्याने विद्यार्थी व पालकांची एकच धावपळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक दाखल काढून देणारे आपलं सरकार पोर्टलवर तांत्रिक बिघाडामुळे महा ई-सेवा केंद्रांचे कामकाज जवळपास दहा दिवसांपासून विस्कळीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे उत्पन्न, जाती, रहिवासी, अधिवास, नॉन-क्रीमीलेअर आणि ईडब्ल्यूएस दाखल्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. परिणामी प्रवेशप्रक्रियेच्या तोंडावर विद्यार्थ्यांसह पालकांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे.
दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून या दोन्ही परीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता विविध दाखल्यांसाठी दाखल झालेल्या अर्जाचा अंदाज येतो. राज्य सरकारी कर्मचार्यांच्या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज आधीच प्रभावित झाले होते. त्यानंतर 5 आणि 6 मे रोजी पूर्ववत झालेले पोर्टल पुन्हा बंद पडल्याने दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आता पोर्टलच बंद पडल्याने दाखल्यांच्या प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. उत्पन्न, जाती, रहिवासी, अधिवास, नॉन-क्रीमीलेअर व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत.
मात्र, पोर्टल लॉगिन होत नसल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, बारावीच्या निकालानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दाखल्यांची आवश्यकता वाढली आहे. आता दहावीचा निकालही जाहीर झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशा वेळी दाखले वेळेत न मिळाल्यास प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
एप्रिलच्या मध्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहावी-बारावी निकाल, शिष्यवृत्ती आणि विविध प्रवेश प्रक्रियांमुळे ऑनलाइन अर्जांचा मोठा ओघ वाढतो. याच काळात आपले सरकार पोर्टलवरील तांत्रिक अडचणी समोर येतात. त्यामुळे शासनाने सर्व्हर क्षमता वाढवून कायम स्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
ई-सेवा केंद्र चालकांनाही डोकेदुखी
दाखल्यांसाठी अर्ज केलेले विद्यार्थी व पालक सातत्याने चौकशी करीत असल्याने ई-सेवा केंद्र चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज स्वीकारले आहेत; पण पुढील प्रक्रिया सुरूच होत नाही, अशी प्रतिक्रिया एका ई-सेवा केंद्र चालकाने दिली.
नवीन लिंक ठरली कुचकामी
गेल्या आठवड्यात बंद असणारे आपले सरकार पोर्टल सुरळीत झाल्याचा दावा महाआयडीकडून करण्यात आला. प्रत्यक्षात हे अद्याप सुरळीत झालेले नाही. गेल्या आठवड्यात धक्कास्टार्टप्रमाणे चालणारे पोर्टल पुन्हा बंद पडले. अखेर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आपलं सरकार केंद्र चालकांना नवीन लिंक देवून त्यावर पोर्टल सुरू करण्यास सांगितले. मात्र, ही नवीन लिंक देखील कूचकामी ठरली. ती देखील बंद असल्याचे रविवारी काही आपल सरकार सेवा केंद्र चालकांनी सांगितले.




