Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग १२ - ब्रह्याण्डाएवढा मळा शिंपी…

आषाढीची भावदिंडी : भाग १२ – ब्रह्याण्डाएवढा मळा शिंपी…

नंदन रहाणे

- Advertisement -

मृग नक्षत्र लागले की महाराष्ट्राला वारीचे वेध लागतात. तसे तर ज्येष्ठातच वळीवाचे सडे पडू लागतात, पण आषाढ म्हटले की खास पावसाचेच दिवस. बोलबोलता पश्चिमेकडून, नैऋत्येकडून काळ्या करड्या ढगांच्या फौजा चाल करून येऊ लागतात अन् उन्हाचा चटका ओसरून वातावरण सावळेझावळे बनून जाते. भक्त पंढरीला निघण्याची तयारी सुरू करतात. टाळ-पखावज-भगवी पताका-पडशी अन् पिशवी यांची जुळवाजुळव होते. मैत्ररांशीसवंगड्यांशी बोलणे-चालणे होऊन इतर सामानाचे नियोजन केले जाते. ठरल्या तिथीला माणसे घर सोडतात नि त्र्यंबकेश्वरला, कोथळीला, कौंडिण्यपूरला, नरसीला, आळंदीला, पैठणला, देहूला दाखल होतात. या गावाहून आणि इतरही बर्‍याच ठिकाणांहून दिंड्या, पालख्या निघतात. संतांचे अभंग गात हजारो भाविक पंढरीची वाट चालू लागतात. तेव्हा त्यांच्यावर आषाढ घनांनी आपल्या मायेचा पालव धरलेला असतो… अधूनमधून सरीही बरसू लागतात…

एकंदर ऋतू सहा आहेत खरे, पण त्यातला सर्वात नाट्यमय आणि प्रत्ययकारी ऋतू म्हणजे वर्षाच! वैशाख ज्येष्ठाचे वणवे, होणारी सर्वांगाची काहिली आणि मग दाटून येणारे मेघ, त्यातून कडाड कोसळणारी वीज, एका क्षणी वाजू लागणारे वारे अन् कोसळू लागणारे टपोर थेंबाचे अनंत सर… बघता बघता भुईचे रुपडे पालटते, पोपटी अंकूर फुटतात. त्यांचे हिरवेकंच गालीचे बनतात आणि हे सारे कवतिक डोळेभरी पाहत वारकरी पंढरीला पोहोचतात. तिथे चंद्रभागाही तुडुंब वाहत असते. विठुरायाच्या कृपेचा साक्षात्कार लाखो भक्तभाविकांना हा असा आषाढी वारीतच होतो! त्यापायी ते गैरसोय सोसतात. कित्येकदा रात्री-अपरात्री पाऊस तारांबळही उडवतो. धावपळ होते पण त्यातही ते आनंद शोधतात!

आपल्याला प्यालाभर पाणी हवे असले तर जागेवरनं उठून माठापाशी जावे लागते. माठ रिकामा झाला तर घरच्या मायबहिणीला हंडा-कळशी घेऊन नदीवर, विहिरीपाशी किंवा हापश्याजवळ पोचावे लागते. हातपाय हलवण्याशिवाय तांब्याभर पाणी काही घरात येत नाही. पण सगळा मुलुख चिंब भिजून जावा आणि नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागावते, इतके पाणी आपोआप आभाळाच्या वाटे सर्वत्र उतरते… हा केवढा मोठा चमत्कार म्हणायचा! तिन्ही भावंडांची लाडकी बहीण मुक्ताबाई पण आश्चर्यमुग्ध होऊन उद्गारते की,

गगनी झरे लागती पाण्याचे ।
कोणा पाणाड्याचे ।
सांगणे हे ॥1॥
टाकीया कुदळी न
लागती घण ।
डबडबी गगन ।
पाणियाने ॥2॥
न लगे मोटनाडा,
न लगे रेडापाडा ।
ब्रह्याण्डा एवढा ।
मळा शिंपी ॥3॥
हाव धरी तरी वृत्ती उतावीळ ।
जाली केवळ ।
मुक्ताबाई ॥4॥

पहा, पहा, आकाशातून सगळ्या बाजूंनी पाण्याचे झरे फुटले आहेत. तो कोण पाण्याचा ठाव अचूक सांगणारा आहे की, ज्याच्यामुळे एवढा अमाप जळाचा साठा लागला आहे बरे! एरव्ही, पाण्यासाठी कठीण काळा कातळ फोडावा लागतो. त्याकरता कुदळ, पहारी, घण, छिन्न्या लागतात. ताकदवान गडी माणसे आणावी लागतात. पण इथे तर बघा, सगळे गगन पाण्याने डबडबून ओथंबले आहे. विहिरीतले पाणी वर खेचायचे झाले तर बैल नाही तर रेडे आणावे लागतात. ते नाड्याकासर्‍याने मोटेला जुंपून हाकावे लागतात. तेव्हा कुठे सरीने पाणी वाहू लागते. परंतु हा कोण अदृश्य शेतकरी आहे जो ब्रह्याण्डाएवढा मळा बघताबघता शिंपित असतो…

अरे अजान जीवांनो, त्याला जाणून घ्या, त्यांच्यासमोर नम्र व्हा. तोे जितकी कृपा करील तितकी पदरात घेऊन समाधानी राहा, फार हाव धरू नका. खूप उतावळेपणा करू नका. ही लहानशी मुक्ताबाई आहे ना, हिने त्या कृपाळू शेतकर्‍याला, जगाच्या चालकाला ओळखले आहे. स्वत:लाही पुरेपूर जाणले आहे. तीसुद्धा त्याच्यासारखीच कैवल्यस्वरूप आहे!

ताज्या बातम्या

Nashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार –...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार,...