Friday, May 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग १६ - माझे मनी रुप तुझे

आषाढीची भावदिंडी : भाग १६ – माझे मनी रुप तुझे

नंदन रहाणे

नात्यातली माणसे शक्यतोवर एकमेकांबद्दल फारसे चांगले बोलत नाहीत असे नेहमीच आढळून येते. सतत सोबत राहिल्याने, स्वभावातले अवगुण, उणीवा, दोष पुरेपुर समजलेले असतात. शिवाय, परस्परांकडून ज्या अपेक्षा ठेवलेल्या असतात. त्या पूर्ण न झाल्याने म्हणा किंवा त्यामागचे स्वार्थी हेतू समजल्याने म्हणा… एक प्रकारचा कडवटपणाही निर्माण झालेला असतो. आपापसातील स्पर्धा, असूया, हेवादावा हेही कारणीभूत ठरतेच. त्यामुळे ‘गणगोत अन् सुखाला पोत’ अशी म्हण प्रचारात आलेली असावी. ‘पोत’ म्हणजे पेटता काकडा. कापडी तुकडे वळूनवळून त्याचा जाड सोट तयार करतात आणि तो तेलात भिजवुन गोंधळाच्या वेळी रात्रभर पेटता ठेवतात. या पोताची ज्वाला चांगलाच चटका देते. तसाच अनुभव गणगोताकडून येतो म्हणून ही अन्वर्थक म्हण जुनी माणसे वापरत असत.

- Advertisement -


जगात खूप वाईट वागणारी माणसे जशी असतात, तशी काही अतिशय चांगली माणसेही असतातच. भलेती संख्येने खूप कमी असतील, पण तशी आढळतात तेही सत्य आहे. त्यांचेही 3 प्रकार असतात. काही जगापासून पूर्ण अलिप्त राहतात. ना कोणाच्या अध्यात, ना मध्यात… काही जेवढ्यास तेवढे संबंध ठेवून जगतात. कोणालाही कसलाच उपद्रव देत नाहीत… मात्र, काही जण असे असतात की ते केवळ जगाचे भले करण्यासाठीच जगत असतात. स्वत:ला कितीही त्रास झाला, नुकसान सोसावे लागले तरी ते मागे हटत नाहीत. अशा जगावर उपकार करणार्‍यांनाच संत म्हणतात. संत हे कुणी संन्यासी, वानप्रस्थी वा परमहंस नसतात. तर ते संसार करणारे गृहस्थच असतात. बायको व मुले यांचे पालन करण्याची जबाबदारीही ते निभावत असतात.

मात्र, सर्वांना सुखोपभोगाची, मौजमजेची साधने उपलब्ध करुन देण्याइतपत स्वार्थी विचार, व्यवहार संत करीत नाहीत. त्यामुळे कुटूंबियांना अनेक लहानसहान सुखांपासून वंचित राहावे लागत. साहजिकच रक्ताचे नातेवाईक संतावर वैतागलेले किंवा संतापलेले दिसले तर स्वाभाविक ठरते. मात्र कधीतरी संतांच्या पत्नीला, मुलांना, भावाबहिणींनाही त्यांच्या कार्याचे मोल समजून येत व तेही त्यात सहभागी होऊन भक्तीप्रसाराचे आणि लोक प्रबोधनाचे कार्य करु लागतात. नामदेवराय व तुकोबाराय यांच्या घरातच अशी उदाहरणे आढळतात. त्यापैकी नामदेव सुपूत्र नारायण यांच्या या अंभगात, त्यांच्या समर्पणशील वृत्तीचे जे दर्शन घडते – ते अत्यंत मनोवेधक आहे –


देवा, माझे मी पण
ठेवी आपुले चरणी ।
घाली माझे मनी ।
रुप तुझे ॥1॥
मग मी लोकाचारी
असेन वर्तता ।
राहीन चिंतिता ।
चरणी तुझे ॥2॥
चंदनाची वृत्ती वेधले तरुवर ।
सबाह्य अभ्यंतर ।
काय जाले ॥3॥
सरिता सिंधुसी मिळोनी
हारपली ।
सागरचि जाली । एकसरे ॥4॥
नारा म्हणे शरण
आलो केशिराजा ।
ऐसा भाव माझा ।
करी गावेगी ॥5॥


संत नामदेवांचा नारा हा मोठा मुलगा त्यांना एकूण 4 मुले व 1 मुलगी त्यांपैकी नारा हा थोरला. वडिलांनी घेतलेले विठ्ठलाचे वेड, त्यापायी आईचे व त्यांचे उडणारे खटके, आजी व आजोबांना लागलेली कर्त्या वयाच्या मुलाची चिंता हे सारे या नाराने अनुभवलेले असणारच. मात्र, तो व हे सगळेच नंतर अभंग लिहू लागेलत हे फारच विशेष! याचा अर्थ असा होतो की, नामदेव महाराजांच्या कार्याचे मोठेपण या सर्व कुटूंबियांना समजले होते.

या अभंगात नारा विठ्ठलाला विनवीत आहेत की, हे देवा, माझा जो अहंकार आहे तो काढून घे व तुझ्या पायांपाशी ठेवून दे. त्याऐवजी तुझे रुप माझ्या मनीमनासी ठसव. मग मी लोकांमध्ये वा वरेन खरा, पण सतत तुझ्या चरणांचे स्मरण करीत राहीन…

चंदनाचा वृक्ष काय करतो, तर भोवतीच्या लहानमोठ्या झाडांनाही आपल्याप्रमाणेच सुगंधी बनवून टाकतो. तुझ्यामुळे मी पण अंतर्बाह्य तसाच होईन. नदी येते आणि सागरात विलीन होते. मग तिचे स्वतंत्र नदीपण उरते का? तर नाही! नारा म्हणतो, हे के शिराजा, मी तुला शरण आलो आहे. माझाही भाव तु वेगाने तसाच करुन टाक… माझे स्वतंत्र अस्तित्वच मिटवुन टाक… मला चंदन कर, समुद्र कर, विठ्ठल कर!

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योगमंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्कप्रमुख...