छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
NEET पेपरफुटी प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच, या आंदोलनात आक्रमकपणे आघाडीवर असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके याच्या आई-वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अभिजीत दिपके यांच्या आई वडिलांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजीतच्या आई काय म्हणाल्या
अभिजीत ज्यावेळी अमेरिकेतून निघाला, त्यावेळी त्यांच्या आंदोलनाचे काय होणार, आंदोलन कसे असणार, याबद्दल प्रचंड काळजी वाटत होती. आम्हाला मारण्याच्या धमक्याही मिळत होत्या. काही दिवस आम्ही घर सोडून गेलो. पण ज्या पद्धतीने मागील महिनाभर देशभरातील मुलांनी अभिजीतला साथ दिली, लोकशाहीच्या रक्षणासाठी लढले, ते पाहून मुलगा म्हणून अभिजीतचा अभिमान वाटतो. मागील अनेक दिवस चिंतेने अश्रू यायचे, आज धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुलांना मिळालेल्या यशाचे आनंदाचे अश्रू डोळ्यात आहेत, अशा भावना अभिजीत दिपके यांच्या आईने व्यक्त केल्या.
गेली महिनाभर विद्यार्थी आंदोलनांनी संपूर्ण देशात वेगळे वातावरण होते. ‘जेन झी’ मुलांनी आंदोलनाचा नवी शैली संपूर्ण देशाला दाखवून दिली. कधी मीम्स, कशी नेत्यांच्या भाषणांमधील विनोदी वाक्ये तर कधी क्रांतीच्या घोषणा… ‘जेन झी’ने सरकारला शब्दश: घाम फोडला होता. काहीही झाले तरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोवर मागे हटणार नाही, असा प्रण विद्यार्थ्यांनी केला होता. अखेर ३२-३५ दिवसांनंतर सरकारला युवा शक्तीसमोर झुकावे लागले. शिक्षणमंत्री प्रधान यांनी आज दुपारी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. अभिजीत दिपके आणि सहकाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले. यानंतर अभिजीत दिपके यांच्या आईला भावना अनावर झाल्या होत्या.
इकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग
मुलाच्या आंदोलनाला यश आले, खूप बरं वाटतंय, मुलांच्या कष्टाला फळ मिळालं, गेली महिनाभर जीव भांड्यात होता. महिनाभर झोप लागत नव्हता, मोबाइलही हातात घेऊ वाटत नव्हता, वाईट रील डोळ्यासमोर आली की भीती वाटायची, अभिजीतच्या मित्रांना फोन करायचे, त्याची विचारपूस करायचे. ते मला धीर द्यायचे, असा अनुभव अभिजीतच्या आईने सांगितला. हे प्रसंग सांगताना अभिजीतच्या आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.
कॉकरोच जनता पक्ष आणि देशभरातील मुलांच्या संघर्षासमोर सरकार झुकले. मुलांच्या आंदोलनाचा खऱ्या अर्थाने विजय झाला आहे. आता अभिजीतने लवकरात लवकर घरी यावे. तो दिल्लीवरून नाही आला तर आम्ही त्याला न्यायला जाऊ. तो आल्यावर त्याला खूप घट्ट मिठी मारेन, त्याचे औक्षण करेन, असे अभिजीतची आई म्हणाली.
अभिजीतचे वडील काय म्हणाले?
अभिजीतच्या आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश आले. राजकारणाचा आम्हाला अनुभव नव्हता. म्हणून चिंतेत होतो. प्रधान साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. साधी सरपंचांची खुर्ची कुणी सोडत नाही. प्रधानांनी शिक्षणमंत्रिपद सोडले, त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया अभिजीतच्या वडिलांनी दिली.




