नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून यादरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काल सभागृह स्थगित झाल्यानंतर सीट क्रमांक २२२ च्या खाली नोटांचे बंडल सापडल्याची माहिती दिली. “काल (गुरुवारी) संसदेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की, २२२ नंबरच्या सीटखाली आम्हाला पैशांचे बंडल मिळाले. संबंधित जागा ही तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्यासाठी अलॉट करण्यात आली आहे. दरम्यान, अभिषेक मनु सिंघवी यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
जगदीप धनखड म्हणाले, या प्रकरणाची चौकशी आता नियमांनुसार व्हायला हवी आणि आता ती होत देखील आहे, असे जगदीप धनखड म्हणाले. जगदीप धनखड यांनी संबंधित माहिती दिल्यानंतर सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरु केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “जोपर्यंत या प्रकरणाच्या तपासातून सर्व गोष्टी समोर येत नाहीत तोपर्यंत तुम्ही (सभापती) त्यांचे (अभिषेक मनु सिंघवी) नाव घ्यायला नको होते.
या प्रकारानंतर आता राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यासाठी ही गोष्ट अतिशय गंभीर आणि हास्यास्पद आहे. मी गुरुवारी केवळ तीन मिनिटांसाठी सभागृहात गेलो होतो. दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी संसदेत दाखल झालो होतो. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी १ वाजता जेवणाची सुट्टी झालीय. यानंतर मी संसदेतील कॅन्टीनमध्ये दीड वाजेपर्यंत अयोध्याचे खासदार प्रसाद रेड्डी यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर मी सुप्रीम कोर्टात परतलो होतो. कारण एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी होती, या मुद्द्यांचे राजकारण केले जाते याचे मला फार विचित्र वाटते. लोक कुठेही आणि कोणत्याही सीटवर काहीही ठेवून जातात याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे”. अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
अभिषेक मनु सिंघवी यांनी पुढे सांगितले आहे की, “याचा अर्थ आमच्यापैकी प्रत्येकाकडे एक सीट असली पाहिजे आणि ती सीट लॉक करता आली पाहिजे. चावी सोबत नेण्याची परवानगी असावी, अन्यथा कोणी काहीही करु शकते आणि यावरुन आरोप लावू शकते. जर हे दु:खद आणि गंभीर नसते तर हास्यास्पद असते. मला वाटते याच्या मुळाशी जाण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे. जर सुरक्षा यंत्रणांमध्ये काही त्रुटी असेल तर त्यादेखील उघड करायला हव्यात”. मी जेव्हा कधी सभागृहात जातो तेव्हा ५०० रुपयेच घेऊन जातो असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.