मुंबई । Mumbai
सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी भाषेवरून नवा संघर्ष उफाळून आला आहे. समाजवादी पक्षाचे (सपा) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी भिवंडीत माध्यमांशी संवाद साधताना मराठीत प्रतिक्रिया देण्यास थेट नकार दिला आणि हिंदी भाषेचे समर्थन केले. “मी मराठी बोलू शकतो, पण मराठीची काय गरज आहे? ही प्रतिक्रिया दिल्ली किंवा उत्तर प्रदेशात गेली, तर कोणाला समजणार?” अशी भूमिका त्यांनी मांडल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
आझमी यांच्या या वक्तव्यावर मनविसे (मनसे विद्यार्थी सेना) ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी अत्यंत आक्रमक आणि मनसे स्टाईलने प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे भिवंडीतील कल्याण रोड रुंदीकरणाच्या मुद्द्याऐवजी आता ‘मराठी अस्मिता’ हा नवा केंद्रबिंदू ठरला आहे. आमदार अबू आझमी हे मंगळवारी भिवंडी महापालिकेत कल्याण रोड रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हिंदी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मराठी माध्यमांनी मराठीत बोलण्याचा आग्रह धरताच आझमी यांनी वादग्रस्त भूमिका घेतली.
आझमी यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना नंतर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मी फक्त एका व्यक्तीला मुलाखत देत नव्हतो, तर एकावेळी १० ते १२ पत्रकार उभे होते. जर एक व्यक्ती बोलत असता, तर मी त्याला मराठीत बोललो असतो.” मराठी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहील, तर हिंदीत बोलल्यास माझे म्हणणे पूर्ण देशभरात पोहोचेल, हेच आपले म्हणणे होते, असे आझमी यांनी स्पष्ट केले.
आझमी यांच्या ‘मराठीची काय आवश्यकता आहे’ या वक्तव्यावर मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी आझमींना थेट इशारा दिला आहे. चौधरी म्हणाले, “अबू आझमी, तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करत आहात. मग महाराष्ट्रात बोलताना तुम्हाला यूपीतील भैय्यांची एवढी काळजी का? भिवंडी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात फक्त मराठीच चालेल.” मराठी बोलायला लाज वाटत असेल, तर तुम्हाला आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा सज्जड इशारा चौधरी यांनी दिल्याने आता हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
वाढता वाद आणि मनसेचा इशारा लक्षात घेता अबू आझमी यांनी पुन्हा एकदा या विषयावर मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मराठी भाषेबद्दल आदर व्यक्त करत म्हटले, “मी तुम्हाला दाखवू शकतो की, मी मराठी शिकत आहे आणि मला मराठीवर प्रेम आहे.” “मी कोणाच्या भीतीने नाही किंवा राजकारणात फायदा मिळवण्यासाठी नाही, तर मी या महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे मराठी बोलणे हे माझे कर्तव्य आहे. मला खेद वाटतो की, मी अजून मराठी शिकू शकलो नाही,” अशी दिलगिरीही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी २००९ मधील एका घटनेची आठवण करून दिली, जिथे त्यांना धमकावण्यात आले होते आणि त्यांचे कपडेही फाडले गेले होते, पण तरीही त्यांनी आपले कार्य सोडले नाही, असे ते म्हणाले.
मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांना आझमी यांनी एक सल्लाही दिला. “जे मराठीबद्दल बोलत आहेत, त्यांनी मराठी शिकण्यासाठी लोकांना प्रेमाने जाऊन पुस्तके वाटली पाहिजेत, क्लासेस सुरू केले पाहिजेत, ऑनलाईन शिकवले पाहिजे; तेव्हा मी समजेल की, त्या लोकांना मराठीवर खरंच प्रेम आहे.” अखेरीस, “मी मराठी बोलू शकतो आणि आता बोललो ना,” असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘हिंदी’ आणि ‘मराठी’ या वादावरून महाराष्ट्रातील प्रादेशिक राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.




