नाशिक। प्रतिनिधी Nashik
लाेकसेवा करताना तक्रारदारांकडून बिनदिक्कतपणे लाचेची मागणी करुन लाच घेणाऱ्या येवला तालुक्यातील नगरसूलच्या तलाठ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी(दि.८) ताब्यात घेतले आहे.
सातबारावर मुलाची चुकीची झालेली नोंद करण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील नगरसूलच्या तलाठ्याला एसीबी पथकाने अटक केली. येवला तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू वामनराव पवार (५४) असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदारांच्या वडिलोपार्जित शेत पत्नी व मुलाच्या नावे दुय्यम निबंधकांकडे दस्तनोंदणी केली होती. त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी त्यांनी तलाठ्याकडे दिले. परंतू सदरील नोंदीत मुलाचे नाव चुकल्याने ती रद्द झाली होती. ती दुरुस्ती करून सातबार्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी पवार यांनी एक हजार रुपये व मंडळ अधिकाऱ्यासाठी ५०० रुपये असे १५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, त्याची पडताळणी केली. त्यानंतर बुधवारी (दि. ८) पथकाने सापळा रचला असून लाचखोर पवार यास एक हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी येवला तालुका पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या सूचनेने पाेलीस उपअधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी, विनोद पवार यांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा