Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : ट्रक-दुचाकी अपघातात सासू-सुनेचा मृत्यू; दोन मुले गंभीर जखमी

दुर्दैवी : ट्रक-दुचाकी अपघातात सासू-सुनेचा मृत्यू; दोन मुले गंभीर जखमी

देवळा | प्रतिनिधी Deola

देवळा – कळवण रस्त्यावर भऊर फाट्यानजीक आज सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास आयशर ट्रक व दुचाकी ( स्कुटी ) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील वरवंडी येथील सासू व सूनेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन मुले गंभीर जखमी झाले. या घटनेने वरवंडी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज बुधवार (दि.३) सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास वरवंडी येथील माजी उपसरपंच अनिता विलास शिंदे (वय ५०) व चेतना अविनाश शिंदे (वय २८) ह्या दोन्ही सासू सून , दोन लहान मुलांसह मटाने शिवारातील शेतातून घराकडे स्कुटीने जात असताना कळवणहुन देवळाच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर वाहनाच्या मागील चाकात सापडले. अपघात इतका भीषण होता की या दोन्ही महिला जागीच ठार झाल्या तर त्यांच्यासोबत असलेले गुरू अविनाश शिंदे (वय ३), विधी अविनाश शिंदे (वय ६) हे दोघे चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. त्याना पुढील उपचारासाठी कळवण व सटाणा येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघातात ठार झालेल्या दोन्ही महिलांवर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री उशिरा त्यांच्यावर वरवंडी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलवणारा होता.

अपघातग्रस्त आयशर चालक फरार झाला असून त्याचावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अनिता शिंदे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे तर चेतना शिंदे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. विकास सोसायटीचे माजी चेअरमन व उबाठा गटाचे उप तालुका संघटक विलास शिंदे यांच्या त्या पत्नी व सून होत. या घटनेने वरवंडी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाची आवक; वाचा...

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल सर्वाधिक 3100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 275...