धुळे | Dhule
खाटूश्यामजींचे (Khatu Shyam) दर्शन घेऊन धुळ्याच्या (Dhule) दिशेने परतत असताना राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात (Kota District) रविवारी मध्यरात्री (सुमारे २ वाजता) उभ्या ट्रकला क्रूझरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) धुळ्यातील पवार कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात नेमका कसा घडला?
प्राथमिक माहितीनुसार, धुळे येथील ३६ नातेवाईक तीन वेगवेगळ्या वाहनांतून खाटूश्यामजींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले असता वाटेत एका हॉटेलवर थांबल्यानंतर दोन वाहने मागे राहिली आणि एक क्रूझर पुढे निघून गेली. यावेळी शंभूपुरा गावाजवळ ही क्रूझर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (Truck) धडकली. धडक इतकी जोरदार होती की क्रूझरचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
बचावकार्य आणि जखमींवर उपचार
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी (Police) प्रवाशांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जखमींना तातडीने उपचारांसाठी कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. या घटनेची अतिरिक्त जिल्हाधिकारी (ADM) राजेश जोशी यांनी चौकशी केली आहे.
मृतांची नावे
या दुर्दैवी अपघातात सजन दौलत पवार, उषाबाई सजन पवार, माधवी गणेश पवार, साऊ गणेश पवार, कैलास भगवान पवार, अनिता कैलास पवार, जानव्ही कैलास पवार, बाबूलाल दौलत पवार आणि सुशिलाबाई बाबुलाल पवार या एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे.
नातेवाईकांनी सांगितला थरारक प्रसंग
अपघाताबाबत माहिती देताना कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, आम्ही सर्वजण एकत्र प्रवास करत होतो. हॉटेलवरून निघाल्यावर आमच्या दोन गाड्या मागे राहिल्या आणि एक गाडी पुढे गेली. दरम्यान, बहिणीचा अपघाताबाबत फोन आल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचल्यानंतर वाहनाची झालेली दयनीय अवस्था पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.




