मुंबई | Mumbai
भाजपचे राज्यसभा खासदार आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते रामराव वडकुते (Ramrao Wadkute) यांचे हृदयविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने आज (रविवारी) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच भाजपकडून त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली होती. त्यांच्या निधनाने हिंगोलीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
उपचारादरम्यान दुर्दैवी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, चालताना आणि छातीत त्रास जाणवू लागल्याने रामराव वडकुते स्वतःहून उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल झाले होते. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली.
वडकुते यांची राजकीय कारकीर्द
हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) राजकारणात आणि विशेषतः कळमनुरी मतदारसंघात रामराव वडकुते यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर रामराव वडकुते यांनी पक्षासाठी काम केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे समर्थक म्हणून ते पुढे आले आणि २००४ मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
धनगर-हटकर समाजातील नेतृत्व लक्षात घेऊन त्यांनी शेळी मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला तसेच राज्यमंत्रिपदाचा दर्जाही भूषवला. २००९ मध्ये कळमनुरीची संधी हुकल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वडकुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. २०२१ मध्ये त्यांच्यावर हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर भाजपकडून त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली.




