Monday, August 17, 2026
HomeधुळेAccident News : अजमेरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा शिरपूर फाट्यानजीक भीषण अपघात; नाशिकच्या...

Accident News : अजमेरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा शिरपूर फाट्यानजीक भीषण अपघात; नाशिकच्या दोघांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

धुळे | Dhule

राजस्थान राज्यातील अजमेर येथून देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील शिरपूर शहराजवळील भारत सेल्स सेंटरसमोर आज (शनिवार दि.१८) रोजी घडला.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मोईनुद्दीन रफीक सय्यद (वय ३०) आणि नवाज सादिक शेख (वय २८, दोघे रा. नाशिक) अशी दोघा मृतांची नावे आहेत. मोसीम मेहमूद शेख (वय ३२) हे आपल्या नातेवाईक तरुणासंह कारने (क्र. एमएच १५ सीसी ०००१) अजमेरहून नाशिककडे परत येत होते. कार शिरपूर फाट्याजवळील भारत सेल्स सेंटरसमोर आली असता, त्यांच्या पुढे जाणाऱ्या कंटेनरच्या (क्र. एमएच २० ईजी २४४७) चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून अचानक वळण घेतले. त्यामुळे मागून येणारी कार या कंटेनरवर आदळली.

धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी मोईनुद्दीन सय्यद आणि नवाज शेख यांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात कार चालक मोसीम मेहमूद शेख यांच्यासह कैफ सादिक शेख, साबीर मोईन शेख, साहिल महमूद शेख आणि अयान शेख असरफुद्दीन हे पाच जण जखमी असून प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात (Accident) घडविल्याबद्दल शिरपूर (Shirpur) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

ताज्या बातम्या

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 12 भाविक जखमी

0
दिल्ली। Delhi पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध 'अशोक धाम' मंदिरात एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मंदिरात शिवाभूमीत जलाभिषेक...