पुनदखोरे | वार्ताहर Kalwan
कळवण-देवळा रोडवर मोटारसायकल आणि चारचाकी मॅक्सिमो वाहन यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासादरम्यान घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथील सचिन वसावे आणि विश्वजीत वसावे हे दोघे तरुण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते मोटारसायकल क्रमांक GJ -26-ED 4557 या वाहनाने परतीच्या मार्गाने जात होते. दरम्यान, कळवण-देवळा रोडवर समोरून येणाऱ्या चारचाकी मॅक्सिमो वाहन क्रमांक MH-41-V-3619 त्यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला.
या भीषण धडकेत सचिन वसावे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मयतास कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणून त्याचे शवविच्छेदन करून त्यास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर त्याच्यासोबत असलेला विश्वजीत वसावे याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने जखमी विश्वजीत याला कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णवाहिकेला विलंब; नातेवाइकांकडून संताप व्यक्त
या अपघातानंतर घटनास्थळी मदतीसाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. अपघात घडून एक तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्याने मयताच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अपघातासारख्या गंभीर प्रसंगी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होणे आवश्यक असताना झालेल्या या विलंबामुळे आपत्कालीन आरोग्यसेवेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या दुर्घटनेत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने विसरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस पुढील तपास करीत आहेत.




