नाशिक | प्रतिनिधी
गेल्या वर्षभरात नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता, अचानक गायब झाल्याच्या संदर्भाने दाखल अपहरणाच्या गुन्ह्यांत शहर पोलिसांनी सकारात्मक कार्यवाही केली आहे. ‘ऑपरेशन शोध-२’ अंतर्गत विविध जिल्हे, राज्यातून २१४ मुली व ६२ मुलांना सुखरुप आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे. बहुतांश मुले व मुली हे प्रेमसंबंध व कौटुंबिक कलहातून ‘मीसिंग’ झाले होते, असे एकूणच तपासात समोर आले आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तेराही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता तसेच त्यांचे कुणीतरी ‘अपहरण’ झाल्याबाबत मिसिंग नोद व अपहरणाचे गुन्हे नोंदविले जातात. हे प्रकार सातत्याने घडत असतानाच नाशिकमधून जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या अकरा महिन्यांच्या कालावधींमध्ये अपहरणाचे ३१० गुन्हे दाखल होते. याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या ‘संवेदनशील’ गुन्ह्यांचा तत्काळ व गांभीर्याने तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने पोलीस ठाणेनिहाय पथके व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक युनिटने शोधकार्य सुरु केले. त्यात, मागील अकरा महिन्यांमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अपहरणाच्या गुन्ह्यांचा ‘ऑपरेशन शोध-२ मोहिमेंतर्गत सखोल तपास करण्यात आला. त्याअंतर्गत पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेत अपहृतांचा शोध घेतला. यात आत्तापर्यंत २१४ मुलींना आणि ६२ मुलांना शोध घेण्यात यश आले आहे. अद्यापही ३ मुले आणि ३१ मुलींचा शोध सुरू आहे. आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, अपहृतांच्या शोधासाठी शहर पोलिस आणि विशेष पथके सातत्याने धडपडत असून त्यांना शोधून आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आयुक्तालयाची भावनिक पोस्ट…
‘घराच्या दारात परत आलेल्या एका लेकराच्या डोळ्यातला आनंद शब्दात मावत नाही. परत आलेली प्रत्येक मुलगी, प्रत्येक सापडलेले लेकरू. एका घरात पुन्हा जीव ओतते, पुन्हा दिवा चेतवते, अशी पोस्ट शहर पोलीस आयुक्तालयाने आपल्या विविध सोशल मीडिया हॅन्डल्सवर अपलोड केली आहे. त्यातूनच केलेल्या एकूणच कारवाईचा आढावा मांडला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी नाशिक शहर गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पाच वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोध घेऊन परत घरी आणले होते. पैकी ५ मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सुरक्षितरित्या घरवापसी केली आहे.
ऑपरेशन शोध-२ अंतर्गत…
१ ते २० नोव्हेंबर २०२५ कालावधीत विशेष मोहीम
मोहिमेत १८ मुलींना धुंडाळून काढण्यात यश
अकरा महिन्यांत बीएनएस कलम १३७ (२) अंतर्गत ३१० गुन्हे
शोधून आणलेल्या एकूण मुली- २१४ व मुले ६२
आजही ३ मुले व ३१ मुलींचा यांचा शोध सुरुच
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




