Sunday, September 6, 2026
Homeक्राईमचकवा देणार्‍या 32 आरोपींवर तोफखाना पोलिसांची कारवाई

चकवा देणार्‍या 32 आरोपींवर तोफखाना पोलिसांची कारवाई

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 23 वॉरंटधारक ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने राबविलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये न्यायालयीन वॉरंट असूनही फरार राहणार्‍या 32 आरोपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 23 नॉन-बेलेबल वॉरंट असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, 9 बेलेबल वॉरंट असलेल्या आरोपींकडून जामीन बंधपत्र भरून घेण्यात आले.

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (3 ऑगस्ट) पहाटे ही विशेष मोहीम राबविण्यात आली. न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस पथकाने विविध भागांत एकाचवेळी धाडी टाकत फरार आरोपींचा शोध घेतला. या मोहिमेदरम्यान अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा सराईत गुन्हेगार सुमेध उर्फ टिंग्या किशोर साळवे यालाही अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात विविध न्यायालयांत अनेक गुन्ह्यांचे खटले प्रलंबित असून, त्याच्या अटकेमुळे त्या प्रकरणांच्या सुनावणीला चालना मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याशिवाय बेलेबल वॉरंट असलेल्या नऊ आरोपींकडून आवश्यक जामीन बंधपत्र भरून घेण्यात आले असून, त्यांना नियोजित तारखेला न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि न्यायालयीन वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यापुढेही अशा प्रकारची अचानक कोम्बिंग ऑपरेशन आणि वॉरंट बजावणी मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. न्यायालयाला चकवा देणार्‍या आरोपींविरूध्द कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

ताज्या बातम्या