नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांवर लैंगिक अत्याचार आणि त्यांची आर्थिक फसवणूक (Fraud) करणाऱ्या भोंदू अशोक खरातविरोधातील कायदेशीर कारवाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या प्रकरणातील दोषनिश्चितीबाबतची (चार्ज फ्रेमिंग) सुनावणी येत्या २७ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, मंगळवारी (दि. २१) न्यायालयासमोर सरकारपक्षातर्फे नमुना दोषनिश्चिती सादर करण्यात आली. दरम्यान, खरातने जामीनासाठी केलेल्या अर्जाला विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात विरोध केला आहे.
स्वतःला दैवी अवतार सांगणाऱ्या या भोंदू खरातचे (Kharat) काळे कारनामे उघडकीस आल्यानंतर शहरासह राज्यात खळबळ उडाली होती. १७ मार्च २०२६ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पहिला गंभीर गुन्हा दाखल झाला होता. खरातला अटक झाल्यानंतर एकामागून एक तब्बल ९ गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. यामध्ये ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तर २ गुन्हे फसवणुकीचे आहेत.
पीडितांना न्यायाची (Court) आस असून भोंदू खरातला कठोर शिक्षेची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. खरातने कारागृहातून बाहेर येण्यासाठी जामीनासाठी अर्ज केला असला, तरी अॅड. उज्ज्वल निकम यांच्या आक्रमक युक्तिवादामुळे त्याला जामीन मिळणे कठीण मानले जात आहे. मंगळवारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या नमुना दोषनिश्चितीवर येत्या २७ तारखेला सुनावणी होणार आहे.
सहा प्रकरणांत दोषारोपपत्र वर्ग
एसआयटी व सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police Station) या प्रकरणात कसून तपास केला आहे. दाखल झालेल्या ८ प्रमुख गुन्ह्यांपैकी ६ प्रकरणांमधील दोषारोपपत्रे (चार्जशीट) आधीच सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत. उर्वरित दोन गुन्ह्यांमधील दोषारोपपत्रे लवकरच न्यायालयात दाखल केली जाणार आहेत. यामुळे भोंदू खरातभोवतीचा कायद्याचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे.



