मुंबई | Mumbai
मालेगाव शहरातील (Malegaon City) भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ मध्ये दुचाकीद्वारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभराहून अधिक महिला-नागरीक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी आज (गुरुवारी)विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर पार पडली. यावेळी या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची (Accused) पुरव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांचा समावेश आहे. जवळपास १७ वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर एनआयए न्यायालयात सर्व आरोपी भावूक झाल्याचे बघायला मिळाले.
यावेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, “मला गेल्या १७ वर्षात खूप अपमान सहन करावा लागला. स्वतःच्या देशात आम्हाला आतंकवादी बनवण्यात आले. मी संन्यासी आहे म्हणून कदाचित मी जिवंत आहे, मात्र मी दररोज मरत होते. आज मला आनंद झाला, कोणी तरी आहे जो माझा आवाज ऐकत आहे. हिंदुत्व आणि भगव्याचा आज विजय झाला,असे त्यांनी म्हटले.
तर समीर कुलकर्णी (Sameer Kulkarni) यांना निकाल ऐकताच अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, “१७ वर्ष आम्ही आरोपी नव्हे, तर पिडीत होतो. आज आमचा पुनर्जन्म झाला आहे”,असे त्यांनी म्हटले.
बॉम्बस्फोटातील मृत आणि जखमींना नुकसान भरपाई
मालेगाव बॉम्बस्फोटात जे मृत्यूमुखी पडले होते त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून २ लाख तर जे जखमी झाले त्यांना ५० हजार रुपये देण्यात यावेत असे आदेशही एनआयए न्यायालयाने दिले आहेत.
या आरोपींची निर्दोष मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी ऊर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसीची कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवादविरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला होता. मात्र आता त्यांची या प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आले होते.
२००८ मध्ये नेमकं काय घडलं होतं?
मालेगाव शहरातील भिक्कू चौकात रमजान पर्वानिमित्त खरेदीसाठी गर्दी झाली असतांना २९ सप्टेंबर २००८ मध्ये दुचाकीव्दारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभराहून अधिक महिला-नागरीक जखमी झाले होते. रात्री ९ वाजून ३५ मिनीटांच्या सुमारास दुचाकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने परिसर हादरला होता. या स्फोटात परवीन शैख, मुस्ताक शंख, रफिक शेख, इरफान खान, अजहर सय्यद, हारून शहा या ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडून पळापळ झाली होती. प्रारंभी स्फोट कशाचा झाला हे समजत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र स्फोटामुळे छिन्नविछीन्न झालेल्या दुचाकीमुळे हा बॉम्बस्फोट असल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक संतप्त झाले होते.
या घटनेनंतर भिकू चौकात मोठा जमाव जमला होता, स्फोटातील जखमींना मनपासह शहरातील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रात्रीतूनच सशस्त्र पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.एकूण ३२३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येवून आरोपींना खटल्यासंदर्भात माहिती देण्यात येवून त्यांचे जबाब नोंदविले गेले होते. त्यानंतर आज या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल मुंबई येथे विशेष एनआयए न्यायालयात देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.





