Friday, August 21, 2026
HomeनगरVaijapur News : मासेमारी करताना जाळ्यात पाय अडकला; ५५ वर्षीय इसमाचा पाण्यात...

Vaijapur News : मासेमारी करताना जाळ्यात पाय अडकला; ५५ वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

वैजापूर । प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील भटाणा येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या रहीम युसुफ शेख (वय ५५) या कष्टकरी इसमाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मासे पकडण्याच्या जाळ्यात पाय अडकल्याने ही काळाची झेप ठरली असून, या घटनेमुळे संपूर्ण भटाणा गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रहीम शेख हे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे भटाणा तलावावर गेले होते. तलावात जाळे टाकत असताना, अनपेक्षितपणे त्यांचा पाय जाळ्यातच अडकला. पाण्यातून स्वतःची सुटका करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि हातपाय हलवता न आल्याने त्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.

दुपार उलटून गेली तरी रहीम घरी न परतल्याने नातेवाईकांच्या मनात धाकधूक वाढली. त्यांनी तलाव परिसरात शोध सुरू केला असता ही हृदयद्रावक घटना समोर आली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह तातडीने पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.

सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात भटाणा येथे त्यांच्यावर दफनविधी पार पडला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हिरावल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या गरीब कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी आर्त मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...