येवला | प्रतिनिधी Yeola
शहरातील क्रीडा संकुल गेट जवळ प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करताना एका तरुणास शहर पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले. त्याचेकडून ७ हजार रुपये किंमतीचा १४ चक्री नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांना, क्रीडा संकुल परिसरात अंधाराचा फायदा घेऊन नायलॉन मांजा विक्री होणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी होती. महाजन यांनी, पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलीस सहकाऱ्यांना कळवून कारवाईचे आदेश दिले. पोलिस हवालदार शंशाक जगताप सहकाऱ्यांसह क्रीडा संकुलाकडे गेले. क्रीडा संकुलच्या गेटजवळ एक इसम बसलेला दिसला व त्याचे समोर १-२ इसम हे उभे होते व त्यांना तो नायलॉन मांजाच्या चकऱ्या (नग) देताना दिसला. पोलीसांनी छापा टाकुन त्यास जागेवरच पकडले. तर इतर पळून गेले. सदर कारवाई सोमवारी, (दि. ६) रात्री ९:३० वाजे दरम्यान करण्यात आली.
पकडलेल्या इसमाची चौकशी करता त्याचे नाव अतिश शशिकपुर चौहान (वय १९) मुळ रा.छिब्बी, ता.रसरा जि. बलिया, उत्तरप्रदेश हल्ली रा. वल्लभनगर, बदापुर रोड, येवला असे असल्याचे सांगितले. त्याचे झडती घेतली असता त्याचे ताब्यातील प्लॉस्टीकच्या गोणीमध्ये ७ हजार रुपये किंमतीच्या १४ चक-या (नग) ज्यावर MONO KTC असे इंग्रजीत लिहिलेले वेगवेगळे रंगाचा नायलॉन मांजा आढळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी पंचनामा केला.
पोलीस शिपाई जनार्दन मधुकर दळवी यांचे फिर्यादी वरून अतिश शशिकपुर चौहान याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा