नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात (Simhastha Kumbh Mela) गर्दी (Crowd) नियंत्रणासाठी सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. प्रयागराजमध्ये घडलेली दुर्घटना खेदजनक असून, नाशिकमध्ये (Nashik) अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा कोणतीही दुर्घटना न होता, सुरक्षित पार पडण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याच्या सूचना दिल्या. संत महंताचे निवास क्षेत्र सुरक्षित राहण्यासाठी साधूग्रामसाठी आवश्यक जादा जागेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी, बॅरिकेडस्साठी बांबूऐवजी स्टीलचे बॅरिकेडस् वापरावे, घाटांचे पुनरुज्जीविकरण करावे अशा सूचना गृहविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल (Iqbal Singh Chahal) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिकमधील कुंभमेळा केवळ २ वर्षांवर येऊन ठेपल्याने राज्य शासनाकडून (State Government) कुंभमेळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गेल्या ३ दिवसांपूर्वीच पालक सचिव एकनाथ डवले यांनी कुंभमेळा कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर आज गृहविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. आय.एस. चहल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात सर्व विभागांची बैठक घेत चर्चा केली. यावेळी डॉ. चहल यांनी कुंभमेळ्यासंदर्भात काही राज्यस्तरावरुन काही प्रशासकीय मंजुरीसाठीचे प्रस्ताव प्रलंबीत असतील तर ते तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले.
त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) भुसंपादनाचा प्रश्न तातडीने मागीं लावण्यात यावा. त्र्यंबकमध्ये गर्दी होऊ नये, अप्रिय घटना घडू नये यासाठी कठोर नियोजन करावे, नाशिकमधील साधुग्रामच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. गोदाघाटांचे पुनरुज्जीवन करावे, काही घाट बांधावयाची गरज असल्यास तत्काळ त्या कामांना सुरुवात करावी आदी सुचना दिल्या. सिंहस्थात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच सुचनांचे आदान प्रदान करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे-यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासाठी सीसीटीव्ही (CCTV) लावण्यावर भर द्यावा. अनेक स्तरावर एनजीओची मदतही घेता येईल. त्यासाठी आतापासूनच एनजीओशी संपर्क वाढवावा. त्यांना कामकाजात सहभागी करून घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कामांचे प्रस्ताव सादर करावेत अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बांबूऐवजी स्टील बॅरिकेड्स वापरा
पोलिसांनी (Police) बॅरिकेडिंगवर लक्ष द्यावे. प्रयागराजमध्ये गर्दीमुळे लाकडी बॅरिकेडिंग तुटले. बांबूऐवजी स्टीलच्या बॅरिकेडिंग करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गर्दीमुळे होणाऱ्या अप्रिय घटना टाळण्यासाठी, गर्दी नियंत्रणासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. भक्कम बेरिकेड्स उभारावेत. त्यासाठी संबंधित व्यावसायिकांशी संपर्क साधावा. गर्दी नियोजनासाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल का? याचीही पडताळणी करावी. त्याचे नियोजन पोलीस विभागाने करावे अशा सूचना यावेळी गृह मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल यांनी दिल्या.
अधिकाऱ्यांकडून आढावा सादर
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कुंभमेळ्यातील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याबाबत सर्व विभागांचा नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. पोलीस आयुक्त कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक देशमाने यांनी आपल्या विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली.