मुंबई | Mumbai
नागपूर (Nagpur) येथील भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता चौफेर होणारी टीका आणि वाढता राजकीय विरोध लक्षात घेता अखेर बागेश्वर बाबा यांनी आपल्या विधानावर माफी मागितली आहे.
या विधानावर माफी मागताना बागेश्वर बाबा म्हणाले की, “माझ्या वक्तव्याने कुणाचे मन दुखावले असले तर माफी मागतो. माझे वक्तव्य वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्यात आले. आम्ही ज्यांच्याकडे पाहून हिंदु राष्ट्राची संकल्पना केली. आम्ही त्यांचा अपमान करु शकत नाही. स्वप्नातही याचा विचार करु शकत नाही. देशातील हिंदू आज जिवंत आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे”, असे त्यांनी म्हटले.
तसेच “मराठा साम्राज्य हे आपलेच आहेत. आम्ही सर्व छत्रपतींना मानतो. एक टक्के देखील माझा अपमान करण्याचा विचार नव्हता. माझं बोलणं गुरुंचा महिमा सांगणारे होते. छत्रपती शिवाजी महाराज संत महंतांना किती मानायचे हे मला सांगायचे होते. आम्ही हिंदू राष्ट्राची विचारधारा त्यांच्याकडूनच घेतली आहे. साधू कोणाची निंदा करु शकत नाही. ज्यांची वीरता पाहून आम्ही आमचे चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अवमान होऊ शकत नाही”, असेही बागेश्वर बाबांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बागेश्वर बाबांच्या विधानानंतर शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. राज्याच्या राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर आता बागेश्वर बाबा यांच्या माफीनाम्याने (Apologizes) या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
काय होते वादग्रस्त विधान?
नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासांकडे जाऊन म्हणाले की आपण खुप युद्ध लढलो. आता हे राज्य तुम्हीच सांभाळा. काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही. त्यावर समर्थ रामदास यांनी राज्य मी चालवणार, मात्र आदेश तुमचा असेल सांगितले होते. असे बागेश्वर बाबांनी म्हटले होते.





