अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील देवठाण (Devthan) येथील १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण (Adhala Dam) आज दुपारी काठोकाठ भरले.अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 योगेश जोर्वेकर यांनी दिली. आढळा धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोले तालुक्यातील सहा, संगमनेर (Sangamner) तालुक्यातील आठ व सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील दोन अशा एकूण सोळा गावांचे धरण लाभक्षेत्र आहे. मातीच्या या धरणाची लांबी ६२३ मीटर तर महत्तम उंची ४० मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र १७७ चौरस मीटर आहे. अकोले ,संगमनेर व सिन्नर (Sinnar) तालुक्यातील तीन हजार ९१४ हेक्टर धरणाचे सिंचन क्षेत्र आहे. धरणास दोन कालवे असून. उजवा कालवा ११.८० किलोमीटर तसेच डावा कालवा ८.८० किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे भरून घेण्यात येतात.
या वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धरणात मुबलक प्रमाणात पाणी शिल्लक होते. तसेच मागील पंधरा दिवसांपासून धरणाचे पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणात पाण्याची समाधानकारक आवक होत असल्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भरणारे धरण ३ जुलैलाच भरले.
अकोले तालुक्यातील देवठाण, विरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळेकडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर निमगाव, चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासारवाडी दोन गावे अशा १६ गावांना शेतीसाठी आढळा धरणातून (Adhala Dam) पाणी पुरवठा होत असतो. सध्या आढळा धरणातून २५ क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे शाखा अभियंता महेश सूर्यवंशी व कालवा निरीक्षक मयूर देशमुख यांनी सांगितले.
आढळा धरणाच्या निर्मिती नंतर जुलै महिन्यात धरण पाच वेळा भरले असून आत्ता पर्यंत पावसा अभावी 15 वेळा धरण भरलेले नाही.अनेक वर्षानंतर जुलैच्या पहिल्या सप्ताहात आढळा धरण भरले असले तरी अजूनही म्हणावा असा पाऊस लाभक्षेत्रात बरसला नाही.भर पावसाळी वातावरणातही लाभक्षेत्रातील अनेक उभी पिके आणि चारा पिकांना विहीरींतील पाणीभरणा करावा लागत आहे.आजही लाभक्षेत्रातील बरेच शेतीक्षेत्र तहानलेलेच आहे. आत्ता पर्यंत धरण क्षेत्रात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
– योगेश जोर्वेकर, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, जलसंपदा विभाग अकोले




