अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर भाष्य करताना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी गटावर निशाणा साधला. आतापर्यंत न्यायालयात दोन्ही बाजूंनी झालेला युक्तिवाद जनतेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल जनता आपल्या पध्दतीने देईल. खोके देऊन आमदार कसे विकत घेतले गेले, हेही जनतेने पाहिले आहे, अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे हे बुधवारी (4 नोव्हेंबर) अहिल्यानगर जिल्हा दौर्यावर होते. नेवासा येथून पारनेरकडे जात असताना दुपारी त्यांनी अहिल्यानगर शहरात भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले की, दिवाळीनंतर आमच्या बाजूने युक्तिवाद केला जाईल. मात्र, आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून न्यायालयात जो युक्तिवाद झाला आहे, तो लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता ‘जनतेच्या अदालत’मध्ये काय निकाल लागतो, हे जनता ठरवेल. आमदारांना खोके देऊन विकत घेण्याचे राजकारण कसे झाले, हे जनतेने प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे जनतेला वस्तुस्थिती माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आम्ही मिळून देश चालवू, अशा आशयाचे वक्तव्य मोदी यांनी केल्याची चर्चा आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात नेमके काय संभाषण झाले, हे मी ऐकलेले नाही. त्यामुळे त्या संभाषणाबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र, शरद पवार यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात चांगल्या भावना आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असेल, असे त्यांनी सांगितले.




