नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांचा नागरिकांना त्रास होत असेल, तर त्या विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी उपस्थित केला. शहरातील खड्डेमय रस्ते, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे होणारी गैरसोय, आरोग्य व्यवस्था आणि तपोवनातील वृक्षतोडीवरून त्यांनी राज्य सरकार व महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, नाशिकच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील रस्त्यांची पाहणी केल्यानंतर महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना उबाठा उपनेते दत्ता गायकवाड,गटनेता केशव पोरजे,जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी,शहराध्यक्ष अजिंक्य गीते उपस्थित होते. यावेळी ठाकरे पुढे म्हणाले कि,नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांपासून येत असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास करताना पाठ दुखायची. आजही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. समृद्धी महामार्गावरही पॅच पडले आहेत. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये उद्योग कसे येतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपल्या पाहणीची माहिती मिळताच काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खड्डे बुजविण्याची घाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पेगलवाडी परिसरात आपण जाणार असल्याचे कळताच रात्रीच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नागरिकांना काही काळ त्रास होणार हे मान्य आहे; मात्र कामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्याची पद्धत चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये गरजेनुसार काही ठिकाणी काँक्रीट, तर काही ठिकाणी डांबरी रस्ते आवश्यक आहेत. पावसाळ्यात रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे विकासकामांचे योग्य नियोजन करून ती सुरक्षितपणे पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करत आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहराच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून महापौर आणि प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. कुंभमेळ्याच्या कामांबाबत साधू-महंतांमध्येही नाराजी असल्याचे सांगत, केवळ निधी उपलब्ध आहे म्हणून कामे करायची का, असा सवाल त्यांनी केला. कुंभमेळ्यासाठी नेमकी कोणती कामे आवश्यक आहेत, याचा प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
बनावट कंत्राटांच्या प्रकरणावरून ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. या प्रकरणातील आरोपी हे छोटे मासे असून मोठा मासा भाजप आहे, असा दावा त्यांनी केला. नाशिकची जमीन गिळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत उद्योगांसाठी आवश्यक सुविधा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेतेपद नसतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असून विधानसभा तसेच अन्य व्यासपीठांवर नागरिकांचे प्रश्न मांडत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
तपोवनातील वृक्षतोडीवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. विकासासाठी झाडे तोडणे हा पर्याय नाही. पर्यावरण आणि शहराचा विकास हे दोन्ही एकत्रितपणे जपले गेले पाहिजेत. तपोवन परिसरात वाहतूक तुलनेने कमी असून पर्यायी रस्तेही उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथील झाडे तोडून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी केला. पर्यावरण मंत्री असताना झाडतोडीचा प्रस्ताव समोर आल्यानंतर आपण स्वतः त्याविरोधात नोटीस काढली होती, असे सांगत त्यांनी जुन्या भूमिकेची आठवण करून दिली. अस्तित्वात असलेले पर्यावरण गमावून विकास साधता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेत नागरिकांनी दक्ष राहावे. १७ ऑगस्टपर्यंत बूथ लेव्हल अधिकारी घरी आला नसेल तर नागरिकांनी सोशल मीडियावर समस्या मांडून ऑनलाइन अर्ज करावा. मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत, यासाठी आम्ही लढणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
गडचिरोलीतील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारला जाब विचारला. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा व सुरक्षितता का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ताडदेव येथील शाकाहारी-मांसाहारी वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकाम व्यावसायिकाची बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण, मंत्री आणि अधिकारी असतानाही कुंभमेळ्याचे निर्णय राजकीय पद्धतीने घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिककरांनी आपल्या पैशांचा हिशेब सरकारला विचारावा आणि १७ ऑगस्टच्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.




