पुणे | Pune
गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रोड परिसरात माध्यमांशी संवाद साधत असताना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मारहाण केलेल्या हल्लेखोराची ओळख पटली असून संतोष चव्हाण असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे.
गणेशोत्सव आणि डीजेच्या मुद्द्यावरून विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला चव्हाणचा विरोध असल्याचे त्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमधून दिसून आले आहे. बापट सातत्याने डीजे बंदीची मागणी करत असल्याने संतोष चव्हाणने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे.
Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण
‘गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या कानाखाली मारणार’
बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर त्याला अजून मारायला पाहिजे होतं, त्याला केवळ गणेशोत्सवच दिसतो का? हिंदूंच्या सणावर टीका करण्याचे कारण काय, असे प्रश्न हल्लेखोराने उपस्थित केले. तुझी भूमिका नेमकी काय आहे, असे विचारले असता, माझी कोणतीही भूमिका नाही, मला काही बोलायचेही नाही, फक्त बापटला अजून मारायचे होते, असे संतोष चव्हाण म्हणाला.
हल्ल्यानंतर संतोष चव्हाण घटनास्थळावरून निघून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांची कठोर भूमिका राहील, असेही त्यांनी सांगितले.




