अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपवासासाठी वापरण्यात येणार्या खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत अहिल्यानगरच्या दाळमंडईतील मे. मनोजकुमार मदनलाल शेठिया या दुकानाची तपासणी करण्यात आली. यावेळी कमी दर्जाची व संशयित भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून 1 लाख 9 हजार 520 रूपये किमतीची 536 किलो भगर जप्त करण्यात आली. जप्त केलेला साठा पुढील आदेशापर्यंत विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. भगरचे नमुने विश्लेषणासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार, तसेच सहआयुक्त मंगेश माने यांच्या निर्देशानुसार 13 ऑक्टोबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दाळमंडईतील मे. मनोजकुमार मदनलाल शेठिया या आस्थापनाची अन्नसुरक्षा अधिकार्यांनी तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा व मानके कायदा, 2006 मधील तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने कायद्याच्या कलम 38 अन्वये भगरचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत 95 हजार 600 रूपये किमतीची 478 किलो वजनाची भगर असलेली 956 पाकिटे, तसेच 13 हजार 920 रूपये किमतीची 58 किलो वजनाची भगर असलेली 116 पाकिटे जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 1 हजार 72 पाकिटांमधील 536 किलो भगर जप्त करण्यात आली असून, तिचे एकूण मूल्य 1 लाख 9 हजार 520 रूपये आहे.
जप्त केलेला माल पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल प्राप्त होऊन पुढील आदेश होईपर्यंत या साठ्याची विक्री करता येणार नाही. भगरमध्ये भेसळ आहे किंवा ती मानकांनुसार योग्य आहे की नाही, हे प्रयोगशाळेच्या विश्लेषणानंतर स्पष्ट होणार आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त गौरव जगताप यांच्या उपस्थितीत अन्नसुरक्षा अधिकारी साजिदा मुल्ला आणि किरण जगदाळे यांनी केली. सणासुदीच्या काळात उपवासासाठी वापरल्या जाणार्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
मार्केट यार्डातील किराणा दुकान परवान्याअभावी बंद
नवरात्रोत्सवानिमित्त राबविण्यात येणार्या विशेष मोहिमेदरम्यान अहिल्यानगरच्या मार्केट यार्डातील मे. संजय किराणा या घाऊक विक्रीच्या दुकानाचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीत संबंधित दुकानाकडे अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे परवाना प्राप्त होईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्नसुरक्षा अधिकारी जगदाळे यांनी दुकानाची तपासणी केली. मार्केट यार्डासारख्या महत्त्वाच्या व्यापारी भागात विनापरवाना खाद्यपदार्थांचा व्यवसाय कसा सुरू होता, याबाबत सविस्तर तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.




