अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता. राहुरी) यांच्या अपहरण व खून प्रकरणी खटल्यात माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याने न्यायालयासमोर कबुली जबाब दिल्यानंतर त्याची उलटतपासणी घेण्यात आली. मंगळवारी व बुधवारी उलटतपासणी पूर्ण झाल्यावर आता याप्रकरणी 6 ते 8 जानेवारी 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, पोलिसांच्या दबावाला बळी पडून नव्हे तर मी स्वत: गुन्ह्याची कबुली दिली, असे माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयासमोर सांगितले.
राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याच्यासह पाच जणांना अटक केलेली आहे. सोमवारी (9 डिसेंबर) प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली.
सरकार पक्षाकडून अॅड. उज्ज्वल निकम व मुख्य संशयित आरोपी किरण दुशिंग याच्या वतीने अॅड. सतीश वाणी यांनी बाजू मांडली. माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयासमोर वकील दाम्पत्याचे अपहरण कसे केले, यात कोणकोण सहभागी होते, कट कसा रचला, खून कसा केला याचा घटनाक्रम सांगितला होता. अॅड. निकम यांनी त्याची सरतपासणी घेतल्यानंतर संशयित आरोपीचे वकील अॅड. वाणी यांनी उलटतपासणी घेतली.
अॅड. वाणी यांनी माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याला त्याने सांगितलेल्या घटनाक्रमाच्या आधारावर प्रश्नांची सरबत्ती केली. न्यायदंडाधिकार्यांसमोर दिलेला जबाब व प्रधान जिल्हा न्यायाधीशांसमोर दिलेले निवेदन यात काही मुद्द्यांमध्ये तफावत आहे. सरतपासणीत काही नवीन मुद्दे सांगण्यात आले आहेत, असे सांगत ढोकणे याने कुणाच्या सांगण्यावरून हा जबाब दिला का, त्याने दिलेली माहिती खरी आहे का, ढोकणे याला अटक केल्यानंतर त्याला इतर आरोपींपासून वेगळे ठेवण्यात आले होते, याकडे लक्ष वेधत अॅड. वाणी यांनी उलट तपासणी केली. बुधवारी उलटतपासणी झाल्यावर आता पुढील सुनावणी 6, 7 व 8 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
‘ईव्हीएम’वरून अॅड. निकम यांचा विरोधकांवर निशाणा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने थेट ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित केली आहे. विरोधकांच्या शंका उपस्थित करण्यावरून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निशाणा साधला आहे. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने या पूर्वीही सर्व पक्षाच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची विशेष टेस्ट घेतली होती. मात्र, आज पराभूत झाल्यामुळे अशा रितीने भांडवल करणे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही. त्यांच्याकडे प्रमाणभूत आधार असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावे लागेल. परंतु अंदाज आणि संशयावर कुठलीच गोष्ट कोर्टात टिकाव धरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया अॅड. निकम यांनी दिली आहे.