अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात नोकरीसाठी अर्ज देण्यास आलेल्या एका डॉक्टर तरूणीचा पाठलाग करून, त्यांचे व त्यांच्या बहिणीचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित डॉक्टर तरूणीच्या फिर्यादीवरून वकिलाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, खंडणीचा गुन्हा बुधवारी (8 एप्रिल) पहाटे दाखल करण्यात आला आहे.
हर्षद चावला (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पीडित डॉक्टर तरूणी सावेडी उपनगरात राहते. सोमवारी (6 एप्रिल) सकाळी त्या येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात जिल्हा शल्सचिकित्सक यांच्या कार्यालयासमोर नोकरीचा अर्ज देण्यासाठी आल्या होत्या. यावेळी हर्षद चावला याने त्यांचा पाठलाग केला. पीडितेने विचारणा केली असता, त्याने आपण वकील असून राजकीय लोकांशी संबंध असल्याचे सांगितले. पीडितेचे आणि त्यांच्या डॉक्टर बहिणीचे खासगी व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून ते सार्वजनिक करण्याची धमकी त्याने दिली.
या व्हिडिओच्या बदल्यात चावला याने पीडितेकडे दोन लाख रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याची आणि दोन्ही बहिणींचे वैद्यकीय क्षेत्रातील करिअर संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली. वारंवार पाठलाग करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हर्षद चावला याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत.




