मुंबई । Mumbai
येत्या १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन विभागातर्फे यासंदर्भात ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, ज्या चालकांना मराठी लिहिता, वाचता किंवा बोलता येणार नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा कडक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, मोटार वाहन नियमांनुसार परवाना मिळवण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक चालक प्रवाशांशी मराठीत बोलण्यास टाळाटाळ करतात किंवा त्यांना मराठी समजत नाही, अशा तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो, त्या राज्याच्या भाषेचा आदर करणे आणि ती शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
या मोहिमेची पार्श्वभूमी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या तक्रारीत आहे. मोठ्या संख्येने नवीन स्थलांतरितांना नियमांचे उल्लंघन करून परवाने दिले जात असल्याचा आरोप मेहता यांनी केला होता. याची दखल घेत आता आरटीओ कार्यालयांतर्गत चालकांची केवळ कागदपत्रेच तपासली जाणार नाहीत, तर त्यांची मराठी बोलण्याची आणि लिहिण्याची रीतसर परीक्षाही घेतली जाणार आहे. या परीक्षेत नापास होणाऱ्या किंवा निकषात न बसणाऱ्या चालकांचे परमिट आणि परवाना निलंबित केला जाईल.
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुमारे २.८ लाख रिक्षा आणि २० हजार टॅक्सी परवानाधारक असून, या व्यवसायावर जवळपास ५ लाख चालकांचे भवितव्य अवलंबून आहे. १ मे पर्यंत ही तपासणी मोहीम राबवून आरटीओ आपला अहवाल सरकारला सादर करेल. जर हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरला, तर तो संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नुसार चालकांना मराठी येणे आवश्यक आहेच, पण २०१९ मध्ये हा नियम अधिक कडक करण्यात आला होता. आता या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू होणार असून, यात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे संकेत मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. यामुळे आता परप्रांतीय चालकांना महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषेचे धडे गिरवणे अनिवार्य ठरणार आहे.




