अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
घराच्या खोदकामात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगून ते स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणार्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पुरूषांसह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 1 किलो 600 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे दागिने, 11 मोबाईल फोन आणि एक हँडबॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई बुधवारी (23 सप्टेंबर) जुन्या आरटीओ कार्यालय परिसरात करण्यात आली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शंभू सोलंकी (वय 24), नंदू मानसिंग सोलंकी (वय 36) आणि पूजा राहुल सोलंकी (वय 24, तिघेही रामटेक, जि. नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. नवनागापूर, एमआयडीसी येथील सचिन बाळासाहेब वाघ (वय 30) यांना दोन-तीन दिवसांपूर्वी तीन अनोळखी व्यक्तींनी संपर्क केला. घराच्या खोदकामादरम्यान सोने सापडले असून, त्यातील एक किलो सोने बाजारभावापेक्षा स्वस्तात विकायचे असल्याचे त्यांनी वाघ यांना सांगितले.
त्यानंतर आरोपींनी सोन्यासारखे दिसणारे दागिने दाखवून वाघ यांचा विश्वास संपादन केला. स्वस्तात मोठ्या प्रमाणात सोने मिळणार असल्याच्या आमिषाला बळी पडून वाघ यांनी आरोपींना एक लाख रूपये आगाऊ दिले. उर्वरित व्यवहार पूर्ण करण्यासाठी आरोपींनी त्यांना 23 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता जुन्या आरटीओ कार्यालय परिसरात बोलावले होते. मात्र, व्यवहाराबाबत संशय आल्याने वाघ यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनेची खातरजमा करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, संदीप पवार, शाहीद शेख, विशाल गवांदे, संतोष खैरे, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड आणि भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने 23 सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष जुन्या आरटीओ कार्यालय परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या दोन पुरूष आणि एक महिला तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.




