अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने या मंडळाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष होणार हे निश्चित आहे. सध्या तरी अध्यक्षपदासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येणार असल्याचे सांगत खुद्द डॉ. विखे यांनीच चेअरमन पदाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. दरम्यान, अध्यक्षपदासोबत बँकेच्या उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार. बँकेचे अध्यक्ष उत्तरेतील झाल्यास उपाध्यक्ष दक्षिणेचा होणार की बँकेतील दोनही पदे उत्तरेकडे राहणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांच्या सहमती एक्सप्रेसच्या सहकार विकास आघाडीला तब्बल 17 जागा मिळाल्या. त्यानंतर अकोलेतील अपक्ष संजीवनी शिंदे यांनी विखे-थोरात- गडाख यांच्या मंडळासोबत सहकार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बँकेते विखे-थोरात- गडाख यांचे संख्याबळी 18 झाले आहे. तर विरोधीत सहकार परिवर्तन मंडळाला अवघी एक तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मंडळाला दोन जागा मिळाल्या. विखे-थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. यात सध्या तरी विखे गटाचा अध्यक्ष होणार असल्याचे सांगण्यात येत असून डॉ. सुजय विखे हेच पहिले अडीच वर्षासाठी दावेदार मानले जात आहे. अर्थात या निवडणुकीत विखे गटाचे 6 तर थोरात गटाचे 11 संचालक निवडून आले आहे. परंतू महाविकास आघाडी व महायुती असा पक्षीय बलाबलाचा विचार केला तर विखे आणि भाजपचे गटाचे संख्याबळ मोठे आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हा उपनिंबधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. या ठिकाणी सहकार विकास आघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने निवडणूक न होता बिनविरोध निवड होईल. तत्पूर्वी मुंबईहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय आदेश येणार, ऐनवेळी काही बदल होणार की पूर्वीच्या नियोजनानूसार अध्यक्ष जाहीर होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमिवर गेल्या दोन ते तीन दिवसात लक्ष वेधणार्या काही घटना घडल्या. त्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट. मंत्री विखे थेट चौंडीला शिंदे यांच्या भेटीला गेले. यावेळी दोन्ही एकत्रित पक्षाची काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची संगमनेरमध्ये सहकार परिवर्तन मंडळाचे एकमेव संचालक असलेले खासदार नीलेश लंके यांनी भेट घेतली. तर दिवाळीच्या निमित्ताने शेतकर्यांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी मंत्री विखे यांनी पाथर्डी तालुका निवडला आणि आमदार मोनिका राजळे यांच्या मतदारसंघात शेतकर्यांबरोबर दिवाळी साजरी केली. यापूर्वी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आमदार राजळे यांच्या नावाची चर्चा घडवून आणण्यात आली होती. त्यानंतर महिला संचालक व आमदार म्हणून त्यांचा विचार करावा अशी चर्चा सुरू झाली. अशावेळी मंत्री विखे यांनी आ. राजळे यांच्या मतदारसंघातील कळसपिंपरी गावात शेतकर्याबरोबर दिवाळी साजरी करून त्या निमित्ताने आमदार राजळे यांची भेट घेतली. या घडमोडीमुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष कोण होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र मुख्यमंत्री बँकेचा अध्यक्ष ठरविणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. मग आता मुख्यमंत्री कोणाच्या नावावर शिक्कमोर्तब करतात हे आता गुरुवारी होणार अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी स्पष्ट होईल.
डॉ. सुजय विखेच चेअरमन!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी माजी खा. डॉ. सुजय विखे हे चेअरमन झालेले आहेत. बँकेच्या निवडणुकीत ते विखे गटाकडून चेअरमन पदाचा चेहरा म्हणून प्रकर्षाने चर्चेत पुढे आले. बँकेच्या चेअमनपदी डॉ. विखे यांची घोषणा होण्यापूर्वी ते चेअरमन असून डॉ. विखे पाटील कारखान्यांच्या अध्यक्षपदाची धूरा ते समर्थपणे यापूर्वीच संभाळतांना दिसत आहे. यामुळे जिल्हा बँकेतील घोषणेपूर्वी डॉ. विखे हे चेअरमनपद भूषवतांना दिसत आहेत.




