संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शेतकर्यांना उभे करण्यासाठी सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याबरोबरच पीकविमा आणि कर्जमुक्ती योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यासाठी शासन शेतकर्यांच्या खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावातील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जात कृषिमंत्री भरणे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी आमदार अमोल खताळ, राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे यांच्यासह महावितरण, ग्रामविकास आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील काही शेतकर्यांच्या पीकविम्यात येत असलेल्या अडचणींची तातडीने दखल घेत, कृषी आणि महसूल विभागाने याबाबत तातडीने चालू खरीप हंगामात कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी संबंधितांना दिले. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकर्यांची स्वप्ने भंग पावली आहेत. अशा कठीण प्रसंगी शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कर्तव्य असून प्रशासनामार्फत शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शेतकर्यांच्या हिताला आणि मदतीला सर्वोच्च प्राधान्य देऊन शेती, पशुपालन, चारा व पाणीटंचाई यावर तातडीने उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले. केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठीची परिपूर्ण अधिसूचना शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केली जाणार आहे.
यामध्ये सर्वसमावेशक मदतीचा समावेश असणार असून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पावसाअभावी सोयाबीनचे पूर्ण नुकसान झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शेतकरी बांधवांना धीर दिला. कृषिमंत्री भरणे म्हणाले की, स्वतः मी शेतकरी असून शेतकर्यांच्या वेदना आणि परिस्थिती अनुभवली असल्याने आपण शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी असून शासनामार्फत देण्यात येणार्या सर्व मदतीसाठी खंबीरपणे उभे असल्याचे ग्वाही दिली. शेतकर्यांना वीजपुरवठा वेळेत होत नसल्याने पाणीपुरवठा होण्यास अडचण होऊ नये यासाठी महावितरणच्या संबंधित विभागाने रोहित्र योग्य वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश महावितरण विभागास दिले.




