Saturday, September 26, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘अहिल्याभवना’तून नारीशक्तीला बळ - मंत्री विखे पाटील

Ahilyanagar : ‘अहिल्याभवना’तून नारीशक्तीला बळ – मंत्री विखे पाटील

महिला व बालविकास विभागाची 14 कार्यालये एकाच छताखाली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नारीशक्ती देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्त्री ही सन्मानाचे प्रतीक असून, मातृशक्तीचे सक्षमीकरण झाल्याशिवाय समाजाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी साकारण्यात येणार्‍या महिला व बालविकास भवन अर्थात ‘अहिल्याभवना’तून महिलांच्या उत्कर्षाचे काम होणार असल्याने या नारीभवनाच्या माध्यमातून नारीशक्तीला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

महिला व बालविकास भवन (अहिल्याभवन) इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या वास्तूसाठी 15 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या इमारतीत महिला व बालविकास विभागाची तब्बल 14 कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे महिलांसह नागरिकांची वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची बचत होऊन विविध शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभ होणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचविण्यासोबतच आरोग्यविषयक जनजागृतीचे कामही अंगणवाडी सेविकांकडून प्रभावीपणे केले जात आहे. महिलांना शेतकर्‍याचा दर्जा देण्याचा निर्णय हा महिला शक्तीचा सन्मान करणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी प्रास्ताविकात ‘अहिल्याभवना’च्या माध्यमातून विभागाची 14 कार्यालये एकाच छताखाली येणार असल्याची माहिती दिली.

बचतगटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ द्या
महिला बचतगटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. बचतगटांच्या उत्पादनांची विक्री केवळ विविध प्रदर्शनांमधील स्टॉलपुरती मर्यादित न ठेवता त्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. महिलांच्या यशोगाथा समाजासमोर आणून त्या इतर महिलांपर्यंत पोहोचविल्यास सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या