अहिल्यानगर (प्रतिनिधी)
निरंतर नगरसेवा… ब्रीद मिरवणार्या महापालिकेने आता शहराच्या अहिल्यानगर नामांतरानंतर आपला लोगोही (बोधचिन्ह) बदलण्याचे ठरवले आहे. या नव्या लोगोमध्ये विश्वास निरंतर…जनसेवा तत्पर असे नवे ब्रीदवाक्य घेण्यात आले आहे. हे नवे बोधचिन्ह व नवे ब्रीदवाक्य नगरकरांना पसंत आहे की नाही, हे पडताळण्यासाठी नागरिकांच्या हरकती व सूचना येत्या 11 डिसेंबरपर्यंत मागवण्यात आल्या आहेत.
30 जून 2003 रोजी अहमदनगर महापालिका अस्तित्वात आली. त्यानंतर सहा महिन्यांतच पहिल्या निवडणुका डिसेंबर 2003 मध्ये झाल्या. मात्र, मनपा स्थापन होऊन पहिली निवडणूक होईपर्यंतच्या सुमारे सहा महिन्यांच्या काळातच मनपाची नवी कर रचना, नवी प्रभाग रचना, नवी प्रभाग कार्यालये व अन्य प्रशासकीय सोपस्कार पार पाडले गेले. याच सोपस्कारांतील महत्त्वाचा भाग म्हणजे नव्या मनपाचे बोधचिन्ह तयार केले गेले.
यासाठी मनपाने त्यासाठी स्पर्धाही घेतली होती. त्यातून अनेकांनी अनेकविध प्रकारचे लोगो पाठवले त्यानंतर त्या काळातील ज्येष्ठ पत्रकार व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले गेले व मनपाचा नवा लोगो आकाराला आला. अहमदनगर महानगरपालिका अशा वळणदार अक्षरांच्या खाली किल्ल्याची प्रतिकृती व त्यावर अर्ध चक्रांकित औद्योगिक प्रगतीचे द्योतक उद्योग चक्र रेखाटलेले होते व खालच्या बाजूला वळणदार अक्षरात निरंतर नगरसेवा… हे ब्रीद वाक्यही आहे. मनपाची ओळख या बोधचिन्हाने आतापर्यंत होत राहिली आहे.
21 वर्षांनी झाला बदल
महापालिका स्थापन होऊन आता 21 वर्षे झाली आहेत व 22 वे वर्ष सुरू आहे. खरे तर मनपाचे बोधचिन्ह बदलायची तशी गरज नव्हती. मात्र, आता अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर झाले असल्याने मनपानेही आपले बोधचिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मनपावर सध्या लोकनियुक्त पदाधिकार्यांचे राज्य नाही तर आयुक्त रुपातील प्रशासक आहे. त्यांच्या काळातच हे नवे बोधचिन्ह करण्याचे भाग्य मनपाला मिळाले आहे.
या नव्या बोधचिन्हात अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर असे वरच्या बाजूला वळणदार अक्षरात नमूद असून त्याखाली मध्यभागी किल्ल्याचे रेखाटन व त्यावर भगवा ध्वज व शिवमुद्रा आहे. तसेच किल्ल्याच्या प्रतिकृतीतील दरवाजात अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. तसेच किल्ला रेखाटनाच्या बाहेरच्या दोन्ही बाजूंना ढाल-तलवारीची चिन्हे आहेत व खालच्या बाजूला सरळ रेषेत… विश्वास निरंतर जनसेवा तत्पर… असे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. नागरिकांच्या हरकती व सूचनांनंतर हे नवे बोधचिन्ह मनपा इमारतींवर व मनपाच्या सर्व शासकीय कागदपत्रांवर दिमाखात झळकणार आहे.
हरकती व सूचना द्या
अहमदनगर महानगरपालिकेचे नाव बदलून अहिल्यानगर महानगरपालिका असे करण्यात आलेले असल्यामुळे या नावास समर्पक, आकर्षक व सुंदर बोधचिन्ह असणे क्रमप्राप्त आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ुुु.राल.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अहिल्यानगर महानगरपालिकेचे नवीन बोधचिन्ह नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. जुन्या बोधचिन्हाऐवजी नवीन बोधचिन्ह वापरण्यासाठी नागरिकांच्या हरकती व सूचना 11 डिसेंबरपर्यंत मागविण्यात येत आहेत. नागरिकांच्या हरकती व सूचना या कालावधीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिका मुख्य कार्यालय येथील छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रोड, अहिल्यानगर येथील आवक टपाल विभागामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत, असे मनपाचे आयुक्त तथा प्रशासकांनी स्पष्ट केले आहे.