अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेच्या 14 सोसायटी मतदारसंघासह 7 सर्वसाधारण मतदारसंघातील जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यातील नेवासा, संगमनेरसह, शेवगाव आणि कोपरगाव सोसायटी मतदारसंघाचा विषय संपलेला असला तरी पारेनर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत, श्रीरामपूर या ठिकाणी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यासह जनरलच्या काही जागांवर रस्सीखेच सुरू असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर देखील काही जागांसाठी लढत होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, नेत्यांच्या एकीनंतर देखील काही ठिकाणी कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये बेकी असल्याचे दिसून आले.
दरम्यान, मंगळवारी रात्री जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी वेगवान घडामोडीची शक्यता होती. त्यानूसार अनेक ठिकाणी चर्चेचे सत्र सुरू होते. या चर्चेची फलनिष्पत्ती आज दुपारी तीननंतर समोर येणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दसर्याच्या दिवशी नगरमध्ये जोरदार राजकीय घडमोडी घडल्या. राजकारणात एकमेेकांना पाण्यात पाहणारे नेते जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, सहकार वाचवा यासाठी एकत्र आल्याचे पाहवास मिळाले. मात्र, एकीच्या चर्चेनंतर देखील जिल्हा बँक बिनविरोध होईल, हे सांगतांना नेत्यांच्या आवाजात जोर दिसून आला नाही. यामुळे जिल्हा बँक निवडणुकीसाठी काही जागांसाठी लढत अटळ असल्याचा अंदाज आल्याशिवाय राहिला नाही.
अशी झाली नेत्यांची एंट्री
दसर्यादिवशी दुपारी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर दुपारी तीन वाजता नगरचे आ. संग्राम जगताप यांचे आगमन झाले. त्यानंतर कोपरगावचे आ. आशुतोष काळे व माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले एकाच गाडीतून आले. त्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहातील एका कक्षात माजीमंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, किरण लहामटे, विक्रम पाचपुते, हेमंत ओगले, विवेक कोल्हे, प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप, काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार वैभव पिचड, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी संचालक भानुदास मुरकुटे, करण ससाणे, राजेंद्र नागवडे यांच्यात चर्चा रंगली.
कट्टर विरोधकांचे गळ्यात गळ
ऐरवी नगरच्या राजकारणात एकाच पक्षात असतांना अथवा एकाच सत्तेत असतांना एकमेकांना कडवा विरोध करणारे नेते मंगळवारी जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सूर आवळतांना दिसले. यावेळी हस्य, विनोदाच्या मफैली जमल्या. तर उमेदवारी मिळणार की नाही, आपल्या नेत्याचे काय होणार होणार या टेन्शनमध्ये भर ऐसीमध्ये अनेकांच्या भाळी घामाच्या धारा दिसून आल्या. आपली उमेदवारी पक्की, सर्वपक्षीय नेत्यांच्या शब्दामुळे आपले संचालक पद नक्की अशा अर्विभावात काहीजण वावरतांना दिसले.
नेत्यासोबत पीए यांची गट्टी
यावेळी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांसह त्यांच्या खासगी पीए यांची मोठी फौज दिमतीला हजर होती. आपल्या नेत्यांनी गट्टी केल्याचे पाहून पीए (स्वीय साहयक) यांनी आपली गट्टी जमवल्याचे दिसून आले. मात्र, नेत्यांकडून हुकूम येताच त्याची पूर्तता करतांना अनेक पीए यांची नुसती धावपळ यावेळी पाहावसाय मिळाली.
बैठकीनंतर खा. लंकेंची सावध प्रतिक्रिया
जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला अडथळा नसून जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व नेते एकत्र आले. बँकेबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत खेळीमेळीत चर्चा झाली असून जिल्हा बँकेत आपण नसलो तरी चालेल. पण बँकेची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली. मात्र, दुसरीकडे लंके बँकेच्या निवडणुकीसाठी पारनेर सोसायटी मतदारसंघातून जोरदार तयारी करत असल्याने या मतदारसंघात निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.




