अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता आणि लिकिंग होत असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील तीन तर अकोले, श्रीगोंदा, शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी एक केंद्राचा समावेश आहे.
रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथकांचीस्थापना करून त्यांच्या मार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहिम हाती घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून युरीयाची वाढती मागणी व युरीया विक्रीमध्ये होत असलेल्या गैरप्रकाराच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारी रोखण्यासाठी व ई-पॉस वरील खत साठा व गोदामातील प्रत्यक्ष खत साठा यामध्ये तफावत आढळून येत होत्या. त्यानुसार कृषी विभागाने जिल्ह्यात सर्वच कृषी सेवा केेंद्रांची तपासणी मोहिम व्यापक स्वरूपात राबविली.
या तपासणीमध्ये कृषी निविष्ठा कायदा, अत्यावश्यक अधिनियम तसेच पवारने अटी व नियमानुसार त्रुटी आढळून आल्या. यात अकोले, श्रीगोंदा व शेवगाव या तीन तालुक्यात प्रत्येकी 1 असे तीन व कोपरगाव तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांच्या रासायनिक खताचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकर्यांना बियाणे, युरीया व अन्य खते वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाची पूर्ण तयारी झालेली असून हंगामात शेतकर्यांना कृषी निविष्ठा उपलब्धते बाबत अडचण निर्माण होणार नाही. याबाबत शेतकर्यांना कोणतीही अडचण किंवा कृषीसेवा केंद्रांबाबत तक्रार असल्यास त्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सुधाकर बोराळे यांनी केले आहे.





