Friday, July 31, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत गुरुपौर्णिमेचा महासोहळा

Shirdi : शिर्डीत गुरुपौर्णिमेचा महासोहळा

लाखो साईभक्तांनी अनुभवला भक्तीचा महासागर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी जगभरातून आलेल्या लाखो साईभक्तांनी भक्तीचा महासागर उसळविला असून साईनामाच्या अखंड गजराने संपूर्ण शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे. साईबाबा संस्थानच्यावतीने आयोजित तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवात राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून आणि परदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. विविध राज्यांतून आलेल्या पालख्यांच्या आगमनाने संपूर्ण शिर्डीचे वातावरण भक्तीत तल्लीन झाले होते.

- Advertisement -

उत्सवाच्या मुख्य दिवशी साई सच्चरितच्या अखंड पारायणाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे आणि खरेदी व्यवस्थापक कुणाल आभाळे यांच्या उपस्थितीत ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. पहाटे श्रींच्या मंगलस्नानाने दिवसाची सुरुवात झाल्यानंतर पाद्यपूजा, लेंडीबागेतील शताब्दी ध्वजपूजन, माध्यान्ह आरती, भजन, कीर्तन, धुपारती आणि रात्री ढोल-ताशांच्या गजरात श्रींच्या रथाची पारंपरिक मिरवणूक पार पडली.

मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी शिर्डी शहरातून साईबाबांच्या पादुकांची सुवर्ण रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कर्नाटक येथील दानशूर साईभक्त एस. प्रकाश यांच्या देणगीतून मंदिर परिसरात करण्यात आलेली रंगीबेरंगी फुलांची भव्य पुष्प सजावट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली. या सोहळ्यात मुंबईतील एका साईभक्ताने तब्बल 47 लाख रुपये किमतीचा 300 ग्रॅम वजनाचा आकर्षक सुवर्ण हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला. जो भक्ती व समर्पणाचे तेजस्वी प्रतीक ठरला.

समाधी मंदिरापासून लेंडीबाग, द्वारकामाई, गुरुस्थान ते नगर-मनमाड महामार्गापर्यंत प्रत्येक रस्ता भाविकांच्या ओसंडून वाहणार्‍या गर्दीने फुलून गेला होता. महामार्गासह शिर्डीतील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग आणि स्वयंसेवकांच्या काटेकोर व नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे वाहतूक सुरळीत राहिली आणि भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय श्रींचे दर्शन घेता आले. आज गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम, काल्याचे कीर्तन, दहीहंडी, साईभजन, नृत्योत्सव आणि पारंपरिक पालखी सोहळ्याने या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता होणार आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात पुन्हा पाऊस; निळवंडेतून 10209 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदराचा विसर्ग, वाकी तलावाचा ओव्हरफ्लो त्यामुळे निळवंडेतही आवक वाढल्याने...