पुणे | Pune
राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत महायुतीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठा भूकंप होता. हा निर्णय त्यांनी का घेतला? यामागील नेमकं कारण काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मात्र, या संपूर्ण सस्पेन्सवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात अजित पवारांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात बोलताना मौन सोडत गुपित उघडे केले.
मला देश आणि महाराष्ट्राच्या विकासाशी जोडायचंय
अजितदादांच्या महायुतीत जाण्याच्या निर्णयावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले, “जेव्हा अजितदादांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मलाही आश्चर्याचा धक्का बसला होता. मी त्यांना विचारले होते की, तुमची एक राजकीय पार्श्वभूमी आहे, या निर्णयाने जनतेला आणि सर्वांनाच झटका बसेल, तुम्ही सत्ता येते-जाते असे असताना एवढा मोठा निर्णय का घेत आहात? त्यावर दादांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले होते की, ‘अमित भाई, प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचा विकास आणि महायुती या दोन्ही गोष्टींना वेगळं करता येत नाही. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाशी स्वतःला जोडून घ्यायचं आहे, त्यामुळे मला महायुतीचं सदस्य व्हायचं आहे|”, असे त्यांनी म्हटले.
कार्यकर्त्यांसाठी देवेंद्र फडणवीस आणि माझ्याशीही भांडायचे!
अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, “दादांना महायुतीत यायला थोडा उशीर झाला, त्यांचे दोन-तीन प्रयत्न अयशस्वी झाले होते. मात्र, एकदा ते महायुतीत आल्यावर ते आमचे घनिष्ट मित्र बनले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी माझ्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी अगदी संयमाने वाद घातले होते. जेव्हा लोक मोठ्या पदावर जातात, तेव्हा ते केवळ स्वतःच्या हिताचा विचार करतात; पण दादांनी नेहमी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या नात्याचा विचार केला. कार्यकर्त्यांसाठी लढणारा असा नेता वेगळाच असतो, असे ते म्हणाले.
दादांच्या जाण्याने देशाला आणि मनाला मोठा धक्का
अजितदादांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल बोलताना अमित शाह भावूक झाले. “सकाळी ८ ते साडेआठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि अत्यंत दुर्दैवी घटना समजली. या घटनेने केवळ मनालाच नव्हे, तर शरीर आणि हृदयही कापरं भरलं. असा कामाचा माणूस वेळेच्या आधीच आपल्यातून निघून गेला, ही फार मोठी हानी आहे. संवेदनशीलपणे काम करणे, शिस्त आणि वेळेची मर्यादा पाळणे ही दादांची कार्यप्रणाली तरुणांसाठी नेहमीच आदर्श राहील,” असे शाह यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळातील आठवणींना उजाळा
अजितदादांच्या कामाचा झपाटा सांगताना अमित शाह म्हणाले की, “कोरोना काळात इतर नेत्यांशी संपर्क होत नसताना अजितदादांचा मात्र नेहमी फोन यायचा. कोरोना काळात आमचं अनेकदा सकाळी ७ वाजता लँडलाईन फोनवर बोलणं व्हायचं, यावरून ते किती सकाळी कार्यालयात हजर असायचे हे दिसून येते. जे पटलं ते होय आणि जे नाही पटलं ते थेट नाही म्हणणारे परखड व्यक्तिमत्त्व अजितदादांचे होते”, असेही शाहांनी नमूद केले.
पुतळा अनावरण सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आयोजित या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात सर्वच नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडवरील प्रेमाबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या.




