अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 369 उमेदवारी अर्जांची मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या कार्यालयात छाननी करण्यात आली. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय अर्जांची छाननी सुरू होती. यावेळी पूर्ण-अपूर्ण अर्ज, आवश्यक कागदपत्रे, त्रुटी तसेच दाखल अर्ज स्वीकारला अथवा राखून ठेवला आहे, याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केली. छाननीनंतर आक्षेप असलेल्या अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. त्यामुळे उमेदवारांसह त्यांचे समर्थक आणि वकिलांची मोठी धावपळ दिवसभर सुरू होती.
उमेदवारी अर्जांसोबत आवश्यक असलेले अर्ज, प्रतिज्ञापत्रे तसेच अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना संधी देण्यात आली. उमेदवारीवर आक्षेप घेणार्या दोन्ही गटांचे म्हणणे निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांनी ऐकून घेतले. या आक्षेपांवरील अंतिम निर्णय आज बुधवारी सकाळी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या दहा वर्षे संचालकपद या मुद्द्यावर मंगळवारी कोणत्याही उमेदवाराने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक राहिलेल्या उमेदवारांचे अर्ज छाननीत स्वीकारण्यात आले. आता संबंधित उमेदवारांच्या अर्जावर कोणताही वैध आक्षेप उरला नाही आणि त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यास संबंधित मतदारसंघात बिनविरोधचा मार्ग मोकळा होणार आहे.
सुचक- अनुमोदकांपासून ऑडिट रिपोर्टपर्यंत त्रुटी
उमेदवारी अर्जांच्या छाननीत सुचक व अनुमोदकांचे आधारकार्ड उपलब्ध नसणे, सेवा सोसायटी मतदारसंघातील उमेदवारांच्या संस्थांचे ऑडिट रिपोर्ट नसणे, तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याचे आढळून आले. संबंधित उमेदवारांना अपूर्ण कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. त्याचबरोबर उमेदवारीवर दाखल झालेल्या आक्षेपांवर स्वतंत्र सुनावणी घेण्यात आली. ओबीसी मतदारसंघातील एका उमेदवाराच्या प्रमाणपत्रावरील नाव आणि उमेदवारी अर्जावरील नावात तफावत असल्याचेही छानणीत समोर आले. त्यामुळे या प्रकरणाकडेही निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाचे 11 उमेदवारांचे अर्ज वैध
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतलेल्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे गटाकडून काल सांयकाळी त्यांच्या गटाचे 11 इच्छुकांची नावे अंतिम मतदार यादीत असल्याचे सांगण्यात आले. यात सचिन धुमरे जामखेड सोसायटी मतदारसंघ, मंगेश जगताप कर्जत सोसायटी मतदारसंघ, मंजुषा गुंड कर्जत सोसायटी मतदारसंघ, ज्योती शिंदे कर्जत सोसायटी मतदारसंघ, अशोक महारनवर जामखेड एनटी मतदारसंघ, अजिनाथ हजारे ओबीसी मतदारसंघ, मंजूषा गुंड कर्जत ओबीसी मतदारसंघ आणि महिला राखीव मतदारसंघ, धनलक्ष्मी हजारे बिगरशेती मतदारसंघ, काकासाहेब तापकीर कर्जत सोसायटी मतदारसंघ, कैलास शेवाळे सोसायटी मतदारसंघ यांचा समावेश असून ही सर्व सभापती शिंदे गटाचे उमदेवार असल्याचा दावा करण्यात आला.
या वकिलांची हजेरी
छत्रपती संभाजीनगरहून विखे यांच्यावतीने अॅड. विनायक होन, अॅड. अभय ओस्तवाल, विखे यांच्या विरोधात विशेष सरकारी वकील अॅड. सुरेश लगड, आ. राजळे यांच्या विरोधात अॅड. गोरक्ष पालवे, शेवगावचे अॅड. खैरे, अॅड. अमोल धोेंडे, अॅड. ढेरे यांच्यासह अनेक वकील उमेदवारी अर्जाच्या सुनावणी आणि छाननीच्या वेळी हजर होते.
निवडणूक न्यायालयात जाण्याची शक्यता
जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल होवून दाखल अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सात जनरल जागांपैकी सर्वच जागांवर ऑडिट वर्ग अ आणि ब आवश्यक नसताना काही ठिकाणी क वर्ग असताना तेथील उमेदवारी अर्ज बाद केले असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला. मात्र, हा आक्षेप एका प्रकारे निकाली काढत संबंधितांचे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आले असल्याने
गुलाल तर उधळणारच!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये दाखल उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेण्यात आले असले, तरी बहुतांश आक्षेप निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, आ. प्राजक्त तनपुरे कुटुंबातील एक सदस्य, संगमनेरमधून रणजित देशमुख, श्रीरामपूरमधून करण ससाणे आणि माजी संचालक गणपतराव सांगळे यांच्या जिल्हा बँकेत प्रवेशाची शक्यता बळावली आहे. त्यामुळे आक्षेप निकाली, आता गुलालाची तयारी! अशी चर्चा जिल्हा बँकेच्या वर्तुळात रंगली आहे. शेवगाव सोसायटी मतदारसंघातून माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. दहा वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा मुद्दा चर्चेत असतानाही त्यांचा अर्ज छाननीत स्वीकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर दाखल झालेला आक्षेपही निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुरी सोसायटी मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कुटुंबातील एकाची, संगमनेर सोसायटी मतदारसंघातून रणजित देशमुख यांची, श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघातून करण ससाणे यांची, तर एनटी मतदारसंघातून माजी संचालक गणपतराव सांगळे यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे छाननीनंतर आता आक्षेपांवरील अंतिम निर्णय आणि त्यानंतरचे राजकीय समीकरण याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




