Saturday, November 7, 2026
HomeनगरAhilyanagar : उमेदवारीसाठी एकमेकांना वाकुल्या; माघारीच्या डेडलाईनकडे लक्ष

Ahilyanagar : उमेदवारीसाठी एकमेकांना वाकुल्या; माघारीच्या डेडलाईनकडे लक्ष

भाजप-काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिंदेसेना आणि शरद पवार गटाचा ‘एकला चलो रे’चा नारा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीसाठी अवघे दहा दिवस उरले असताना राजकीय गणितांना वेग आला आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाच उमेदवारीच्या आशेने इच्छुकांनी आपापले अर्ज कायम ठेवण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेत्यांची मनधरणी, गटबाजी आणि एकमेकांना राजकीय इशारे देण्याचे सत्र सुरू झाले आहे. भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटांनी आपापल्या राजकीय समीकरणांनुसार भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासह शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटापुढे स्वतंत्र पॅनलचा पर्याय चर्चेत आला आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. नेवासा आणि संगमनेरमधील निवडणूक बिनविरोधच्या दिशेने गेल्यानंतर अकोले, पारनेर आणि श्रीगोंदा या मतदारसंघांतील चुरस कायम असल्याचे चित्र आहे. अन्य तालुका सेवा सोसायटी मतदारसंघांतही तडजोडीच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेतून आपल्याला डावलले जाणार नाही, याची खबरदारी घेत इच्छुकांनी अर्ज कायम ठेवण्यावर भर दिला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरत आहेत. विखे पाटील गट आणि थोरात गट यांच्यातील राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि शरद पवार गटातील इच्छुकांची भूमिका निर्णायक ठरू शकते. या दोन्ही गटांकडून स्वतंत्र पॅनल उभारण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

मात्र, वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम संकेत मिळाले नसल्याने इच्छुकांना अद्याप स्पष्ट दिशा मिळालेली नाही.एका बाजूला बिनविरोध निवडणुकीसाठी तडजोडीचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे उमेदवारीच्या संधीवरून गटांतर्गत रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपात आपल्याला किती वाटा मिळणार, कोणाला संधी मिळणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, यावरून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे सध्या अर्ज मागे घेण्यापेक्षा तो कायम ठेवून शेवटच्या क्षणी राजकीय दबाव निर्माण करण्याकडे कल दिसत आहे.

माघारीच्या शेवटच्या दिवशीच खरे चित्र!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकूण 903 इच्छुकांनी 369 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर 249 अर्ज वैध ठरले असून, आतापर्यंत एका अर्जाची माघार झाली आहे. त्यामुळे माघारीच्या अंतिम टप्प्यात किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.21 ऑक्टोबर हा माघारीचा शेवटचा दिवस असल्याने त्यापूर्वीच्या राजकीय बैठका, नेत्यांच्या गाठीभेटी आणि जागावाटपाच्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही काळ मंदावलेल्या हालचाली सोमवारपासून पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना यश आले, तर अनेक मतदारसंघांतील संघर्ष टळू शकतो. मात्र, जागा वाटपावर एकमत न झाल्यास स्वतंत्र पॅनल उभारण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो. त्यामुळे सध्या सुरू असलेली राजकीय ओढाताण आणि इच्छुकांची धरसोड माघारीच्या शेवटच्या दिवशी कोणते वळण घेते, यावरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार

0
घोटी । जाकीर शेख Ghoti इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून...