Sunday, September 20, 2026
HomeनगरAhilyanagar District Bank : जिल्हा बँकेत यंदाही 'शेपटा'साठीच साठमारी; निवडणुकीचा वारू यंदाही...

Ahilyanagar District Bank : जिल्हा बँकेत यंदाही ‘शेपटा’साठीच साठमारी; निवडणुकीचा वारू यंदाही बिनविरोधच्या दिशेने

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २०२१ प्रमाणे यंदा देखील काही निवडक जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. बँकेच्या निवडणुकीचा हत्ती बिनविरोधच्या दिशेने निघाला असून आता केवळ शेपटासाठी लढती होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बँकेच्या मतदारांची अंतिम यादी जाहीर झाली असून लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी नेत्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सहजासहज आपापले समर्थक यांच्या संचालक मंडळातील जागा फायनल झाल्यावर उर्वरित काही जागांसाठी नेतेच झुंज लावून देणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी २०२१ मध्ये मोठी राजकीय स्पर्धा असताना विखे आणि थोरात गटाने १७ जागा बिनविरोध काढल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीचा वारू उधळण्याआधी फासे नेत्यांनी सावधपणे टाकत आपापली सोय करून घेतली होती. त्यानंतर सोसायटी मतदारसंघातील तीन व बिगर शेती मतदारसंघासाठी लढत झाली.

यात नगरमध्ये दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांनी एकतर्फी, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला होता. तर पारनेरमध्ये दिवंगत उदय शेळके यांनी तर बिगर शेती मतदारसंघात पारनेरचे प्रशांत गायकवाड आणि श्रीगोंद्याचे दत्तात्रय पानसरे यांच्यात लढत झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी गायकवाड यांना ताकद दिली होती. तर पानसरे यांना लोणीवरून रसद पुरवली गेल्याची चर्चा होती. मात्र, या लढतीत गायकवाड यांनी बाजी मारली होती.

यंदा मात्र, सुरूवापासून जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार असे चित्र रंगवण्यात येत असतांना आता या निवडणुकीतील प्रमुख दोन नेत्यांनी हात आखडता घेत निवडणुकी बिनविरोध करण्यासाठी खूनवाखुनवी सुरू केली आहे. आधी निवडणुकीत वारेमाप खर्च केल्यावर पुन्हा चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याने जे शक्य होईल तेवढ्या जागा बिनविरोध काढण्याचा प्रयत्न विखे आणि थोरात यांच्यावतीने सुरू करण्यात आला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

मागील पंचवार्षिकला बाळासाहेब थोरात गटाकडे असणारी शेतीपूरक मतदारसंघाची जागा बिनविरोध व्हावी, यासाठी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांना देण्यात आली. यामुळे त्या ठिकाणी सोसायटी मतदारसंघातून विवेक कोल्हे बिनविरोध निघाले तर शेतीपूरकमधून आ. काळे हे बिनविरोध विजयी झाले. यंदा देखील शेतीपूरक, बिगशेती, राखीव मतदारसंघातील जागा बिनविरोध होण्यासाठी कोणते प्रयोग होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अकोले, कर्जत श्रीगोंद्यात महायुतीमध्ये टेन्शन

जिल्हा बँकेतील पारंपारिक विरोधक असणारे विखे थोरात गटाऐवजी सध्या अकोले, कर्जत आणि श्रीगोंदा सोसायटी मतदारसघांत महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात स्पर्धा आहे. या ठिकाणी जिल्हा बँकेची निवडणूक लादल्यास महायुतीमध्ये टेन्शन होणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Manisha Jejurkar Suicide Case : डाॅ. नीलेश जेजुरकरला चार दिवसांची पोलीस कोठडी;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर रोड येथील डॉ. मनीषा जेजुरकर (Dr Manisha Jejurkar) यांच्या आत्महत्या प्रकरणात (Suicide Case) तब्बल १९३ दिवसांनंतर नाशिक जिल्हा शासकीय...