नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूर रोड येथील डॉ. मनीषा जेजुरकर (Dr Manisha Jejurkar) यांच्या आत्महत्या प्रकरणात (Suicide Case) तब्बल १९३ दिवसांनंतर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभागप्रमुख संशयित डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट एकने १८ सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. शनिवारी (दि. १९)) त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य विचारात घेऊन या प्रकरणाचा तपास सरकारवाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील (Gangapur Road) रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर संशयित डॉ. नीलेश याने विविध न्यायालयांत अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र नाशिक सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानंतर अखेरीस १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे नसून हत्येचे असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. शवविच्छेदन अहवालात फेरफार झाल्याचा आणि खिडकीच्या दोरीवरून ही हत्या झाल्याचा संशय वकिलांनी न्यायालयात व्यक्त केला होता.
हे देखील वाचा : Manisha Jejurkar Case : १९३ दिवसांचा बचावाचा खेळ थांबला; डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्येप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजुरकर अटकेत
विशेष म्हणजे, घटनेनंतर पसार झालेला नीलेश उच्च न्यायालयात (Court) अर्ज केल्यानंतर पुन्हा शासकीय सेवेत रुजू झाला होता. पोलीस तपास व न्यायालयात सादर माहितीनुसार, सन २०२१ पासून नीलेश पत्नीकडे दुर्लक्ष करून एका त्रयस्थ महिला डॉक्टरच्या सांगण्यावरून वागत होता. ९ एप्रिल रोजी नोंदवलेल्या एका महिला डॉक्टरच्या जबाबामुळे नीलेशच्या विवाहबाह्य संबंधांच्या बाबीला दुजोरा मिळाला आहे. जानेवारी २०२६ मध्ये नीलेशच्या मैत्रिणीने डॉ. मनीषा यांना फोन करून हिणवले होते. तसेच ५ मार्च रोजी एका लग्नात झालेला जाहीर अपमान आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी (६ मार्च) झालेली आत्महत्या यातील अल्प कालावधी पाहता, यात प्राथमिकदृष्ट्या गुन्हेगारी हेतू स्पष्ट दिसत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
त्रयस्थ महिला डॉक्टरची चौकशी होणार
या प्रकरणात पती-पत्नी दोघेही नैराश्यावर उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक कलहाला आणि डॉ. मनीषा यांच्या मानसिक छळाला कारणीभूत ठरलल्याचा आराेप असलेल्या त्या त्रयस्थ महिला डॉक्टरचीही लवकरच पोलीस चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




