दिंडोरी | प्रतिनिधी |Dindori
कसबे वणी–नाशिक रस्त्यावर (Kasbe-Vani Road) ओझरखेड धरणाच्या (Ozarkhed Dam) सांडव्याच्या पुढे हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास थार आणि इर्टिगा गाडीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात इर्टिगा गाडीतील चालक सुनिल अरुण शिंदे यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, थार (क्र. एमएच १५ जेएच ८८८२) नाशिकच्या दिशेने, तर इर्टिगा (क्र. एमएच १५ केयू १२०५) वणीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) उपचारासाठी पाठवले.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे (Vani Police Station) सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड व पोलीस (Police) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
जखमींची नावे
या अपघातात (Accident) अजय पाटील, दिनेश पाटील, काजल पाटील, भावेश पाटील, शिवसागर शिंदे आणि यश पाटील हे सहा जण जखमी झाले आहेत. हे सर्व वरखेडा येथील रहिवासी असून इर्टिगा गाडीतून प्रवास करत होते. जखमींना पुढील उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात हलविण्यात आले, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.




