राहाता |वार्ताहर| Rahata
धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून आवर्तनाचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला असला, तरी आगामी काळ अधिक आव्हानात्मक असणार आहे. पुढील आवर्तने झालीच, तर ती केवळ पिण्याच्या पाण्यासाठी असतील. त्यामुळे पाण्याबरोबरच खर्चाचीही बचत करा. चारा उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी कृषी सहाय्यक आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांनी समन्वयाने गावपातळीवर सर्वेक्षण करावे, अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. टंचाईच्या परिस्थितीत लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी यापुढील सर्व बैठका विभागनिहाय घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मागील महिन्यात टंचाई आढावा बैठकीत केलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने केलेली कार्यवाही आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्री डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलहुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी टंचाई आढावा बैठकीच्या निमित्ताने तालुक्यातील गावनिहाय पाणीस्थिती, चारा टंचाई आणि पाणीपुरवठा योजनांच्या समस्या जाणून घेतल्या. गावांतील समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना आणि मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागांच्या अधिकार्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पाणीपुरवठा योजनांच्या समस्या अद्यापही सुटत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साकुरी गावातील पाणीपुरवठा योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित काम रखडल्याने ग्रामस्थांना पाणी मिळू शकत नसल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली. सद्यस्थितीत गोदावरी आणि निळवंडे धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे मोठा दिलासा मिळाल्याबद्दल बैठकीत मंत्री विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी उपस्थित शेतकर्यांच्या निदर्शनास आणून दिले. धरणात पाणी उपलब्ध होते म्हणून आवर्तने देता आली. मात्र, पुढील काळ अत्यंत आव्हानात्मक असून, पुढील आवर्तने झालीच तर ती केवळ पिण्याच्या पाण्यासाठी असतील. त्यामुळे पाण्याचा अपव्यय करू नये, अशा सूचना त्यांनी अधिकारी आणि शेतकर्यांना दिल्या.
मुळा आणि कुकडीचे आवर्तन सुरू आहे. मात्र, या काळात कुठेही अनधिकृत पाणीउपसा होऊ देऊ नये. आवर्तनाच्या कालावधीत अधिकार्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. वाकडी, चितळी, आडगाव आदी गावांतील ग्रामस्थांनीही यावेळी विविध सूचना मांडल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधन हा ग्रामीण भागाचा एकमेव आधार ठरणार आहे. त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. गावपातळीवर पशुधन, पशुपालक आणि चारा उत्पादनासाठी इच्छुक असलेल्या शेतकर्यांची माहिती अद्याप संकलित झालेली नसल्याबद्दल त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांबाबत नाराजी व्यक्त केली.
प्रत्येक गावात कृषी सहाय्यक आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांनी एकत्रितपणे सर्वेक्षण करून चारा उत्पादनाचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. उपलब्ध पाण्यामुळे रब्बी पिकांना आधार मिळेल; मात्र चारा उत्पादनासाठीही आवर्तनाचा लाभ करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले. महायुती सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. 50 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झालेल्या शेतकर्यांच्या नावांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र, बँका अधिक व्याज आकारत असल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या. याबाबत तालुका विकास अधिकार्यांनी बुधवारी विशेष बैठक घेऊन शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करावे. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी बुधवारी कार्यालयात उपस्थित राहून गावनिहाय वीजविषयक प्रश्नांचे निराकरण करावे, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
नव्याने आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने प्राधान्यक्रम निश्चित करावा. दर महिन्याला कामकाजाचा आढावा घेतला जाणार असून, यापुढील बैठका विभागनिहाय घेण्यात येतील. टंचाईच्या परिस्थितीत लोकांना आधार देण्याचे महायुती सरकारचे धोरण आहे. इतर सर्व खर्चांना फाटा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
पाण्याबरोबरच खर्चावरही नियंत्रण आणण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. विवाह सोहळ्यांवरील खर्च कमी करून 50 लोकांच्या उपस्थितीत समारंभ आयोजित करावेत. राहाता तालुक्याने याची सुरुवात करून राज्यासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी बैठकीत पुन्हा एकदा केले.




