Saturday, October 3, 2026
Homeनगरअकोले, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, कर्जतमध्ये मतभेद; बिनविरोधच्या घोषणेनंतर नेत्यांची 'थंडा करके खाओ'...

अकोले, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, कर्जतमध्ये मतभेद; बिनविरोधच्या घोषणेनंतर नेत्यांची ‘थंडा करके खाओ’ भूमिका

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील डझनभर नेत्यांनी पुढाकार घेतल्यानंतरही काही तालुक्यांतील राजकीय समीकरणे अद्याप जुळलेली नाहीत. बिनविरोधच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी जागावाटपावर एकमत झाले असले, तरी अकोले, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर आणि कर्जत या तालुक्यांतील जागांवर अद्याप मतभेद कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर, म्हणजेच सोमवार (दि.५) नंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

बिनविरोध निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकारणाला अचानक वेग आला. प्रमुख नेत्यांसोबतच दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील इच्छुकांनीही उमेदवारी अर्ज खरेदी आणि दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे आतापर्यंत शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. मात्र, यातील किती उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहणार, याबाबत सध्या उत्सुकता आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होऊ द्यायचे आणि त्यानंतर माघारीच्या टप्प्यात समेट घडवून आणायचा, अशी रणनीती आखली जात आहे. त्यामुळे सध्या इच्छुकांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू असली तरी नेत्यांनी मात्र घाई नको, आधी अर्ज दाखल होऊ द्या, अशी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

गेल्या महिनाभरापासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. सुरुवातीला सेवा सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी तालुकानिहाय राजकारण रंगले. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सेवा सोसायटी मतदारसंघातील बहुतांश जागांबाबत प्रमुख नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी अकोले, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर आणि कर्जत या तालुक्यांतील काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. त्याचबरोबर शेतीपूरक आणि बिगरशेती मतदारसंघातील जागांबाबतही वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, बिनविरोध निवडणुकीचा उखळीबार फुटल्यानंतर सहकारातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. त्यामुळे सध्या नेत्यांकडून थंडाकरके खाओची भूमिका घेतली जात असून, कोणतीही घाई न करता शेवटच्या क्षणापर्यंत वाटाघाटी सुरू ठेवण्याचे धोरण दिसत आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीच्या टप्प्यात कोण कोणाच्या गळ्यात गळा घालणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकमेकांना कात्रजचा घाट दाखविण्याची धडपड राजकारण सुरू आहे. त्यामुळे काही जागांवरील चुरस वाढली आहे. गतपंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यंदाही बहुतांश जागांवर शेवटच्या क्षणी तडजोड होण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी ज्या जागांवर एकमत होणार नाही, तेथे प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर कोण कोण रिंगणात राहतो, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

शिंदे, विखे, थोरात, गडाख, कोल्हे, पाचपुते, कर्डिले यांचे सोमवारी अर्ज ?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, सभापती राम शिंदे, माजी मंत्री शंकरराव गडाख, जयश्री थोरात, आ. विवेक कोल्हे, प्रतापसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, आ. अक्षय कर्डिले यासह प्रमुख नेत्यांचे सोमवारी अखेरच्या दिवशी उमदेवारी अर्ज दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी गणेश गितेंची...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Nashik Agricultural Produce Market Committee) अखेर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, अध्यक्षपदी गणेश...